लेमन “टी’मधून लेमन गायब, मिरचीचा ठसका वाढला

पिंपरी -उन्हाची तीव्रता वाढत असल्याने लिंबूला मागणी वाढली आहे. एक लिंबू 5 रुपयांना मिळत असल्याने चहा वाल्यांनी तो वापरणे बंद केल्याने लेमन टी मधून लेमनच गायब झाला आहे. तर हिरव्या मिरचीचाही ठसका चांगलाच वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे सरबतासाठी लिंबाचा वापर होत असल्याने बाजारात लिंबूला मागणी वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून लिंबाला मागणी वाढल्याने भावही वाढले आहेत. आकारानुसार 1 लिंबू 5 तर दहा रुपयांना 3 लिंबू मिळत आहेत. मात्र, ते चहा विक्रेत्यांना परवडत नसल्याने अनेकांनी लेमन टी बनविणे बंद केले आहे. मोठा लिंबू घेतला तर काही ठिकाणी तो दहा रुपयांनाही 2 विकले जात आहेत. भाव वाढीमुळे तो चहाच न विकलेला बरा, असे चहा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
मिरची आवाक्याबाहेर
गृहिणींच्या रोजच्या स्वयंपाकात आवश्यक असणारी हिरवी मिरचीही भाव खात आहे. पोपटी रंगाची मिरची कमी तिखट तर गडद हिरव्या रंगाची मिरची जास्त तिखट असते. याच नावांनी ग्राहकांकडून मागणी होते. त्यांचेही भाव वाढले आहेत. कमी तिखट मिरची 100 ते 120 रुपये किलो तर जास्त तिखट मिरची 140 ते 160 रुपये प्रतिकिलो आहे.
वाढत्या महागाईने ग्राहक त्रस्त
रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या भावात रोजच वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. भाज्यांचे भावही रोज वाढत आहेत. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडत आहे. यावर उपाययोजना करावी, अशी गृहिणींची मागणी आहे.





