विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन; मस्साजोग, आझमींवरून सभागृहात गोंधळ

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येची समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली छायाचित्रे आणि अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानावरून विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक झाले. अबू आझमींच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली.
तर विरोधकांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. गदारोळानंतर सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले. अबू आझमींना निलंबित करावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आली होती. या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित केले.
आझमींना सभागृहात राहण्याचा अधिकार नाही : शिंदे
औरंगजेबाचे गोडवे गायल्याबद्दल सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली. औरंगजेबाचे गोडवे गाणे म्हणजे, आपल्या महापुरुषांचा, आपल्या देशभक्तीचा अपमान असल्याचे ते म्हणाले. औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, असेही शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या मागणीनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
हे सरकारच बरखास्त करा :आदित्य ठाकरे
गेल्या काही महिन्यांत राजकारण एवढे घाणेरडे झाले आहे, कधी सरपंचांना सांगतात तुम्हाला फंड देणार नाही, तुम्हाला अधिकार देणार नाही असेही सांगतात. पण हेच सरकार एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही का? स्वत:च्याच कार्यकर्त्याला ते न्याय देऊ शकत नाहीत का? असा प्रश्न विचारत, हे सरकार बरखास्तच केले पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
पायऱ्यांवर सत्ताधारी- विरोधक आमने-सामने
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले. महायुती सरकारमध्ये दोन दोन गुंडे, कोकोटे आणि मुंडे, घोटाळे करा क्लीनचीट मिळवा, अशी घोषणाबाजी विरोधकांकडून केली गेली. तर अबू आझमींनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. अबू आझमीची हकालपट्टी करा, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली गेली.

