मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

Mumbai News| रेल्वेस्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून स्थानिक मराठी नावे देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. यादरम्यान आता मुंबईतील सात रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव विधानसभेत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आला.
नामांतर करणाऱ्या रेल्वे स्थानकांची नावे
पश्चिम रेल्वेवरील मरीनलाईन्स स्थानकाचे मुंबादेवी, चर्नीरोडचे गिरगाव आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीनचे काळाचौकी, मध्य रेल्वेच्या करीरोड रेल्वेस्थानकाचे लालबाग, सँडहर्स्ट रेल्वेस्थानकाचे डोंगरी, डॉकयार्ड रोडचे माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे नामांतर करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत मांडला.
तर दुसरीकडे दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याच्या मागणी केली जात आहे. दादर स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करावं, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी करण्याची मागणी डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादरलाच राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे अंतिम विधी देखील येथेच झाला.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी यावेळी डॉ. राऊत यांनी राज्य शासनाला केली. राज्य सरकारने आता विधिमंडळात ठराव मंजूर करून केंद्र सरकारला शिफारस करण्याची भूमिका घेतली आहे.
याआधी 2018 मध्ये राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी केलं. ओशिवारा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असं नाव देण्यात आले.
हेही वाचा:
कॅफेच्या आडून… ‘भलतंच’ जातंय घडून..! अंधाऱ्या कोठडीतील काळे सत्य पोलिसांनी आणले समोर




