पुणे जिल्हा | शासकीय नोकरी सोडून केला पवार गटात प्रवेश

बेल्हे, (वार्ताहर) – शासकीय अधिकारी आणि संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था व उम्मत की खिदमत फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे हाजी गुलामनबी शेख यांनी मंत्रालयातील शासकीय नोकरी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
तसेच त्यांच्या समवेत जुन्नर तालुका अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अकबर पठाण यांनीही प्रवेश केला. शरदचंद्र पवार यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीने प्रेरित होऊन अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्याच्या आशेने हाजी यांनीपक्ष प्रवेश केला आहे.
नगर येथील शिवस्वराज्य मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके, राष्ट्रवादी युवाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, नगर जिल्ह्याचे निरीक्षक व माजी आमदार अंकुश काकडे, नितेश कराळे यांच्या उपस्थितीत हाजी गुलामनबी शेख यांनी पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी माजी आमदार दादा कळमकर, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष साबीर अली सय्यद आणि नगर जिल्ह्यातील विविध पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





