बाजारभाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत
मंचर – सध्या धना आणि मेथीचे बाजारभावात घसरण झाल्याने तसेच पीक काढणीचा खर्चही वसूल होत नसल्याने अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्यांनी उभ्या कोथिंबीर, मेथीच्या पिकांत शेळ्या, मेंढ्या सोडल्या आहेत.
अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव आदी गावातील शेतकरी नगदी पैसे मिळवून देणारी फ्लॉवर, कोबी, बीट, काकडी, मिरची, वांगी यांसारखी पिके घेत असतात.
डिसेंबर महिन्यात कोथिंबीर व मेथी पिकाला शेकडा 4 हजार ते 5 हजार रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धना आणि मेथीचे पीक घेतले. परंतू सध्या मेथी आणि कोथिंबीरीची जुडी एक ते दोन रुपयांना विकली जात आहे. या कवडीमोल बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही सुटत नाही.
त्यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतातील कोथिंबीर व मेथीच्या पिकात मेंढ्या, बकरे सोडावी लागत आहेत. भांडवली खर्चही सुटत नसल्याने मेंढ्या सोडण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी मानसिंग शिंदे, सारंग शिंदे यांनी सांगितले.