“बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी शरद पवारांच्या पायाच्या नखावरची धूळसुद्धा उडणार नाही”; आव्हाडांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

मुंबई : भाजपाच्या मिशन बारामतीमुळे राज्याच्या राजकाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यादरम्यान २०२४ च्या निवडणुकांमध्ये बारामतीचा गड भाजपच जिंकेल निर्धार व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून बावनकुळेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी शरद पवारांच्या पायाच्या नखावरची धूळसुद्धा उडणार नाही”, असे आव्हाड म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळेंनी बारामती दौऱ्यादरम्यान ‘गड वगैरे कुणाचा नसतो’, असे विधान करून एकच खळबळ उडून दिली आहे. यावेळी बावनकुळेंनी काटेवाडीतील मारुती मंदिरात दर्शन देखील घेतले. दरम्यान, बावनकुळेंच्या या विधानानंतर आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “१९९० नंतर शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही हे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उमगले. त्यानंतर जे कधी सत्यात उतरले नाहीत असे खोटेनाटे आरोप सातत्याने, बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही, असे आपल्या ट्वीटमध्ये आव्हाड म्हणाले आहेत.
1990 नंतर शरद पवार साहेबांचे
नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं.त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 7, 2022
“आजही काहीजण परत एकदा शरद पवार आणि बारामती यांच्याबद्दल बोलत आहेत. गड उद्ध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत. विसर्जन करू म्हणत आहेत. अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून”, असा टोला आव्हाडांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाला लगावला आहे.
बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 7, 2022
“बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्धारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे”, असेदेखील ट्वीटमध्ये शेवटी आव्हाडांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपाचं मिशन बारामती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 7, 2022
“बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारुतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. ६० वर्षे प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म शरद पवार याच मारुतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते?”, असा खोचक टोला आव्हाडांनी ट्वीटमधून बावनकुळेंना लगावला आहे.





