Pimpri : शहरातील बांधकाम कामगार मोर्चासाठी नागपूरला रवाना

पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट पद्धतीने करण्यात आली असून विधानसभेच्या आचारसंहितापासून अजूनही सर्व कामकाज बंद आहे. ऑनलाइन पद्धतीने काम सुरू व्हावे व महाराष्ट्र राज्यातील २६ लाख बांधकाम कामगारांचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, अशा विविध मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये दि. १८ रोजी बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
यासाठी कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने नागपूरकडे रावाना झाले आहेत. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणातील कामगार तसेच महासंघाचे इतर जिल्ह्यातील पदाधिकारी व कामगार या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मोर्चा समन्वय समितीमध्ये उपाध्यक्ष राजेश माने, संघटक लाला राठोड, निरंजन लोखंडे, निमंत्रक महादेव गायकवाड, किरण साडेकर, सलीम डांगे, विनोद गवई यांचा त्यात समावेश आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणीबाबत शासन आणि महामंडळ जाणीव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून बांधकाम कामगार योजनेच्या केवळ जाहिराती केल्या जात आहेत. प्रत्यक्षात लाभ मात्र मिळत नाही, दिवाळीला बोनस जाहीर केला, मात्र, प्रत्यक्ष कामगारांना काहीच मिळालेले नाही. आता बोनस देण्यात यावा, विविध योजना या पूर्णतः थंडावल्या असून नोंदणी व नूतनीकरण न झाल्याने दरम्यानच्या कालावधीत कामगारांचा अपघाती मृत्यू झाला, तर याला महामंडळ आणि शासन जबाबदार असेल.
राज्यातील नोंदणी कामे तालुक्याला केंद्र निर्माण केलेले असून सदरच्या ठिकाणातून किरकोळ प्रमाणात नोंदणी होणार आणि पिळवणूक होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील कामगारांची संख्या पाहिली असता नोंदणी प्रक्रिया सुलभ होणे अत्यंत गरजेचे आहे. असे काशिनाथ नखाते यांनी म्हटले आहे.





