लिअँडर पेस २०२०मध्ये करणार टेनिसला अलविदा

नवी दिल्ली : भारताचा महान टेनिसपटू लिअँडर पेसने पुढील वर्षी टेनिसमधून निवृत्त होणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. साल २०२० हे माझे व्यावसायिक टेनिसमधील अखेरचे वर्ष असेल असे त्याने सांगितले आहे.
#OneLastRoar pic.twitter.com/WwALCVF5LO
— Leander Paes OLY (@Leander) December 25, 2019
याबाबत पेसने ट्विटरवर पोस्ट करताना म्हटले की, ” मी जाहीर करू इच्छितो की, २०२० हे माझे व्यावसायिक टेनिसमधील अखेरचे वर्ष असेल. या वर्षी मी निवडक स्पर्धांमध्येच खेळणार आहे.” पुढे पेसने लिहले आहे की, ” तुम्ही सर्वांनी मला आजवर खेळण्यासाठी प्रेरित केले आहे आणि त्याबदल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.”
दरम्यान, आपल्या कारकिर्दीत दुहेरीमध्ये १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणा-या ४६ वर्षीय पेसला २०१६ नंतर एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक दुहेरी क्रमवारीत तब्बल १९ वर्षांनी पेसला पहिल्या १०० खेळाडूंमध्ये स्थान पटकावता आले नव्हते.
डेव्हिस कप-२०१९ स्पर्धेत पेसने जीवन नेदुन्चेझीयनसह दुहेरीतील ४४व्या विजयाची नोंद केली होती. यासह डेव्हिस कप टेनिस स्पर्धेतील आपल्या दुहेरीतील विजयाचा स्वतःचा विक्रम त्याने मागे टाकला होता.





