पिंपरी : थंडीपासून हंगाम सुरू झालेला मटार, फ्लॉवर व गाजराची आवक वाढली असून दरही आवाक्यात असल्याने ग्राहकांकडून या फळभाज्यांना मागणी वाढली आहे. तर कांद्याचे दर जवळपास निम्म्याने घटले असून, त्याचा गृहिणींना दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभुमीवर मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची 3,752 क्विंटल तर पालेभाज्यांची 63,300 गडड्या आवक झाली आहे. कांद्याची 406 क्विंटल आवक झाली असून, क्विंटलचा सरासरी दर 2600 रुपये राहिला. तर किरकोळ बाजारात 50 रुपयांनी विक्री होणार्या कांद्याचार आता 30 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. बाजारात रविवारी (दि.29) सर्वाधिक बटाट्याची 852 क्विंटल आवक झाली असून, क्विंटलचा सरासरी दर 1800 रुपये राहिला. कांद्याची 406 क्विंटल आवक झाली. तर टोमॅटोची 498 क्विंटल आवक झाली असून, किरकोळ बाजारात टोमॅटोचा प्रतिकिलोचा दर 30 रुपये राहिला. थंडीमुळे मटारची 246 क्विंटल आवक झाली असून, प्रतिकिलो 60 रुपये दराने विक्री होत आहे. गाजराची 177 क्विंटल आवक झाली असून, किरकोळ बाजारात गाजराची 40 रुपये किलो दराने विक्री होत आहे. फ्लॉवरची आवक 479 क्विंटल झाली असून गडड्याच्या आकरमानानुसार त्याची विक्री होत आहे. कोबीची 225 क्विंटल आवक झाली; तर वांग्याची 133 क्विंटल आवक होऊन, किरकोळ बाजारात वांग्याचा दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलो राहिला. घेवड्याची 45 आवक झाली असून प्रतिकिलोला 60 ते 80 रुपये दर मिळाला. तर पावट्याची 16 क्विंटल आवक झाली. भेंडीची 73 क्विंटल आवक होऊन क्विंटलचा सरासरी दर 4000 रुपये राहिला. कारल्याची 27 क्विंटल तर वालाची 16 क्विंटल आवक झाली. घोसाळी व गवारची प्रत्येकी सात क्विंटल आवक झाली. तर तोंडली व सुरणाची प्रत्येकी एक क्विंटल आवक झाली. रताळ्याची 15 क्विंटल तर मका कणीसची 19 क्विंटल आवक झाली. मिरचीची 155 क्विंटल आवक झाली तर आल्याची 57 क्विंटल आवक झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सर्वाधिक 31,900 गडड्या आवक झाली. त्याखालोखाल मेथीची 1,32,00 गडड्या, पालक 6500 गडड्या, पुदिना3800 गडड्या, शेपू 2700 गडड्या, कांदापात 2200 गडड्या, हरभरा 1800 गडड्या, मुळा 1000 गडड्या तर चवळीच्या 700 गडड्या आवक झाली. या सर्व पालेभाज्यांची सरासरी 10 रुपये प्रति गडडी विक्री होत आहे.