नेत्यांना बसला पावसाचा फटका; मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांसह आ.अमोल मिटकरींना रेल्वे ट्रॅकवरुन चालत करावा लागला प्रवास

Mumbai Rain Update | मुंबईत काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. आज दिवसभर पावसाची शक्यता असल्याने मुंबई महानगरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील या पावसाचा फटका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना बसला आहे.
रेल्वे ट्रॅकवरून पायी चालत नेत्यांचा प्रवास
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी जाणाऱ्या काही आमदारांनाही मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील मुसळधार पावासामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे हावडा एक्सप्रेस ही बऱ्याच काळापासून कुर्ला परिसरात अडकली आहे.
या एक्सप्रेसने कॅबिनेट मंत्री अनिल पाटील, संजय गायकवाड, अमोल मिटकरी, जोगेंद्र कवाडे यांसह अनेक आमदार प्रवास करत होते. मात्र अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील रेल्वे ट्रॅकवरुन चालत निघाले. त्यानंतर पुढे उभी असलेली ट्रेन गाठली आणि त्यानंतर ते अधिवेशनात पोहचले.
यावेळी आमदार अमोल मिटकरी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ते सांगतात की, “दादर आणि कुर्ला स्थानकामध्ये राज्याचे मदत आणि पुर्नवसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मी आणि आणखी या ट्रेनमध्ये सात ते आठ आमदार अडकून आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.”
“आज विधीमंडळ अधिवेशनचा अंतिम आठवडा सुरु आहे. त्या अधिवेशनात जाण्यासाठीही प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल, अशी अपेक्षा करतो. याचा सर्वसामान्य लोकांनाही फटका बसला आहे,” असे अमोल मिटकरी म्हणाले. आमदार संजय गायकवाड, हसन मुश्रीफ यांना देखील मुंबईतील या पावसाचा फटका सहन करावा लागला.
विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता
दरम्यान, मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आमदार व मंत्री पोहचले नसल्यास कामकाज काही वेळेसाठी स्थगित केले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:





