निवेदितांनी बनवली लक्ष्मीकांत बेर्डेची आवडती डिश; वाचा लाडक्या लक्ष्याला कोणता पदार्थ सर्वाधिक आवडायचा

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री ‘निवेदिता सराफ’. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘धुमधडाका’, ‘माझा छकुला’, ‘अशी ही बनवाबनवी’सारख्या मराठी चित्रपटांमधून निवेदिता सराफ यांनी एकेकाळी रुपेरी पडदा गाजवून टाकला होता.
अभिनयक्षेत्रात काम करता करता त्या आपली स्वयंपाकाची आवड आवर्जून जोपासतात. विशेष बाब म्हणजे त्यांनी स्वतःच असं एक युट्यूब चॅनल देखील सुरु केलं आहे. आणि या चॅनवर त्या नवनवीन पदार्थांच्या रेसिपी शूट करून टाकत असतात.
तब्बल तीस वर्षे चित्रपट-नाटक आणि मालिकांमधून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या निवेदिता यांनी या माध्यमांचा बदलता काळ अनुभवला आहे. हा बदल स्वीकारत पुढे गेलेल्या कलाकारांपैकी त्या एक आहेत. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवेदिता यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे या सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नुकतंच निवेदिता सराफ यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रेसिपी व्हिडिओ पोस्ट केला असून, सध्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा होऊ लागली. त्यांनी हा रेसिपी व्हिडिओ खास दिवंगत अभिनेता ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांच्यासाठी केला आहे. निवेदिता यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवडीचा एक पदार्थ तयार केला आहे.
त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत लाडक्या लक्ष्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “ही रेसिपी माझ्या हृदयाजवळची आहे, कारण माझा जिवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डेची ही अत्यंत आवडती डिश होती. ही आगरी डिश बनवण्यास सोपी असून ती चविष्टसुद्धा आहे’, असं कॅप्शन लिहित त्यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.





