Lawrence Bishnoi | california : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात झालेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख ‘बनवारी गोदारा’ (वय 23) अशी पटली आहे. या घटनेनंतर रोहित गोदारा गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. रोहित गोदारा आणि लॉरेन्स बिश्नोई गँग यांच्यातील जाहीर वैर सर्वश्रुत आहे. बिश्नोई गँगवर रोहित गोदाराचा हल्ला : काही दिवसांपूर्वी रोहित गोदाराने एका पोस्टमध्ये दावा केला होता की, कॅलिफोर्नियातील हल्ला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हरि बाक्सरवरच करण्यात आला होता. या गोळीबारात हरि बाक्सर जखमी झाला, तर त्याचा साथीदार बनवारी गोदारा ठार झाला. पोलिसांकडून मृताची ओळख पटली : हल्ल्यात ठार झालेला तरुण बनवारी गोदारा होता. तो मूळचा सॅन होजे (San Jose) येथील असून नुकताच फ्रेस्नोमध्ये राहायला गेला होता. पोलिसांच्या मते, अद्याप या प्रकरणात कोणतीही अटक झालेली नाही. दरम्यान, हरि बाक्सरने सोशल मीडियावर असा दावा केला आहे की, गोळीबाराच्या वेळी तो त्या ठिकाणी उपस्थितच नव्हता. कॅलिफोर्नियातील गोळीबाराची संपूर्ण घटना : ही घटना शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. फ्रेस्नो पोलिसांना शॉ आणि ब्रॉली अव्हेन्यूजवळील एका शॉपिंग सेंटरमध्ये दोन व्यक्तींना गोळ्या लागल्याची माहिती मिळाली. ईएमएस टीमने दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, बनवारी गोदाराला वाचवता आले नाही, तर २१ वर्षीय दुसऱ्या जखमीला उपचारानंतर सोडण्यात आले. तपासात उघड झाले की, दोघांवर एस. सीडर अव्हेन्यूवरील एका ट्रक रिपेअर यार्डजवळ गोळीबार झाला होता. त्या भागाचे अधिकारक्षेत्र फ्रेस्नो काउंटी शेरिफ कार्यालयाकडे असल्याने पोलिसांनी तपास त्यांच्याकडे सोपवला. तपास पथकाने अपराधस्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. गोळी लागल्यानंतर एक तिसरा व्यक्ती दोघांनाही गाडीतून अर्जंट केअर सेंटरमध्ये घेऊन गेला असल्याचेही समोर आले आहे. सध्या या घटनेचा तपास फ्रेस्नो काउंटी शेरिफ कार्यालयाकडून सुरू आहे. अधिकाऱ्यांनी या गोळीबारामागील कारणे, गुन्हेगारांचा अचूक मागोवा आणि गँगवारशी असलेले संभाव्य संबंध शोधण्यास सुरुवात केली आहे.