कायदा : संमती आणि लैंगिक अत्याचार

– अॅड. जी. एम. आळंदीकर
अगोदर संमतीने संबंध ठेवायचे आणि नंतर पुरुषावर बलात्काराचा आरोप करायचा, अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण मत नोंदविले आहे. त्यामुळे अशा गुंतागुंतीच्या विषयाला एक दिशा मिळाली आहे.
लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होताना बरेचदा कलम 376 चा दुरूपयोग होताना दिसत आहे. ‘अगोदर संमतीने संबंध ठेवायचे त्यात दुरावा आला की फौजदारी यंत्रणा कामाला लावायची व एखाद्या व्यक्तीला गंभीर गुन्ह्याचा कलंक लावायचा ही पद्धत बंद करा व तक्रारीच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी व न्यायालयांनी या खटल्याची सत्यता तपासावी’, अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना व न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने 26 मे 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल देत महिलेने दाखल केलेला लग्नाच्या आमिषाने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार व अनैसर्गिक संबंध ठेवल्याच्या तक्रारीचा गुन्हाच रद्द करण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा ‘तक्रार रद्द न करण्याचा दिलेला निकाल’ही रद्द केला आहे. तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांना व न्यायालयाला मार्गदर्शन करून प्रत्येक संमतीच्या संबंधाला फौजदारी प्रक्रियेत आणू नका व पोलीस दल व न्यायालय यांच्या वेळेची कदर करा, असा सल्लादेखील पोलीस यंत्रणेला दिला आहे.
अमोल नेहुल विरुद्ध महाराष्ट्र सरकार 2025 सी जे (एस.सी) 542 या खटल्यात चार वर्षांचा मुलगा असलेल्या विवाहित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार केली की पदवीचे शिक्षण घेणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपल्यावर 8 जून 2022 ते 8 जुलै 2023 पर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला असून अनैसर्गिक संबंधदेखील प्रस्थापित केले आहेत. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 376, 376(2)(एन), 377, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला.महिलेच्या तक्रारीनुसार 8 जून 2022 रोजी तिचा त्या विद्यार्थ्याशी परिचय झाला व त्याचे रूपांतर मैत्रीत व प्रेमात झाले.
त्यानंतर जुलै 2022 मध्ये एका रात्री तो विद्यार्थी तिच्या घरी गेला व तुझ्या धर्मानुसार तुझा घटस्फोट झाला की आपण लग्न करू असे म्हणून त्याने तिच्याशी संबंध ठेवले. त्यानंतर वर्षभर विविध ठिकाणी लॉजवर जाऊन त्यांचे संबंध आले. तसेच त्याने अनैसर्गिक संबंधदेखील ठेवले व त्या महिलेचे पैसे व कार त्याने वापरली. त्यानंतर ती महिला विद्यार्थ्याच्या गावी गेली व ‘माझा आता घटस्फोट झाला आहे तू आता माझ्याशी लग्न कर’ अशी मागणी तिने केली. मात्र त्याच्या घरच्यांनी तिला हाकलून दिले व आपण वेगळ्या धर्माचे असल्याने आता आपल्याला लग्न करता येणार नाही म्हणून तिला फसवल्याबद्दल बलात्काराची तिने तक्रार दिली.
दरम्यान, सदर विद्यार्थी याने मुंबई उच्च न्यायालयात सदरची तक्रार खोटी असून आपली बाजू स्पष्ट करत त्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी तिच्याविरुद्ध अगोदरच 22 जुलै 2023 रोजी तक्रार दाखल केली असून सदर तक्रारीमध्ये ही महिला माझ्या मुलाला विविध लॉजवर नेऊन त्याच्याशी संबंध स्थापित करून त्याला फोनवरून लग्न कर नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल व कुटुंबाला त्रास देईल, अशी धमकी देत आहे, असे नमूद केल्याचे सांगितले.
दरम्यान, सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाल्यावर विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात सदरची तक्रार रद्द करावी म्हणून कलम 482 नुसार याचिका दाखल केली, मात्र, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यामुळे सदर विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात गेला. दरम्यान, पोलिसांनी आरोपपत्र देखील दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने बाजू ऐकून तक्रारीचे अवलोकन करून काही महत्त्वाच्या बाबीवर प्रकाश टाकत महिलेची तक्रार पाहिली असता ते दोघे प्रेमात पडले, अनेकदा भेटले, अगदी लॉजवर देखील गेले. यावरून तिच्यावर जबरदस्ती केल्याचे स्पष्ट होत नाही. भा.दं.वि. कलम 90 अंतर्गत महिलेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत नाही. तपासात असे स्पष्ट झाले की तिचा घटस्फोट 29 डिसेंबर 2022 रोजी झाला आहे तोपर्यंत यांचे सबंध आले होते.
म्हणजेच एक लग्न झालेले असताना घटस्फोट होण्याअगोदर तिने लग्नाच्या आमिषाने संबंध ठेवणे पूर्णतः चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच तिच्यावर जबरदस्तीबाबत एकही पुरावा आलेला नसून त्या महिलेचे त्या विद्यार्थ्याच्या घरी पूर्वकल्पना न देता जाणे व लग्नाला आग्रह करणे यावरून महिलेचा स्वभाव व तिचा उद्देश स्पष्ट होत आहे. चार वर्षांचे मूल असलेली महिला परिपक्व नाही असे म्हणता येणार नाही.तसेच ज्याने तिच्यावर जबरदस्ती केली त्यासोबत इतक्या वेळा संबंध कसे ठेवले ही बाबदेखील महत्त्वाची आहे. त्यामुळे केवळ लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली असे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे.
सदरचा खटला हा सर्वोच्च न्यायालयाच्या हरियाणा राज्य विरुद्ध भजनलाल या खटल्यातील कक्षेत येत आहे. ज्यात केलेल्या मार्गदर्शनानुसार जिथे प्रथमदर्शनी आलेल्या तक्रारीनुसार दखलपात्र गुन्हा दिसत नाही, तक्रार करताना दाखल केलेले कागद व तक्रार यातील तफावतमुळे दखलपात्र गुन्हा दिसून येत नाही, जिथे आरोपावरून दखलपात्र गुन्हा होत नसेल तिथे अदखलपात्र गुन्हा असेल अशा वेळी कलम 155(2)नुसार न्यायाधीशाच्या आदेशाशिवाय गुन्हा दाखल झाला असेल, जिथे कायद्याच्या एखाद्या तरतुदीत बाधा निर्माण होत असेल, एखाद्या बाबीमुळे प्रभावशाली भरपाई होत असेल, जिथे एखादी तक्रार केवळ वाईट हेतूने दाखल झाली असेल, अथवा तिचा मूळ उद्देश वैयक्तिक बदला किंवा लोभापायी तक्रार दाखल असेल तर अशा सर्व बाबीत उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांना त्यांचे अधिकार वापरून असे खटले निकाली लावता येतील.
वरील बाबींचा विचार करता सदर महिलेचा उद्देश अयोग्य असल्याचे दिसत असून सदर महिलेने एक लग्न झालेले असताना, घटस्फोट झाला नसताना, एक मूल असताना दुसर्याशी लग्नाच्या आमिषाने संबंध प्रस्थापित करणे व जबरदस्तीची तक्रार करणे ही बाब पूर्णतः चुकीची असल्याने सदर अपीलकर्त्याचे अपील मंजूर करून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून अतिरिक्त सत्र न्यायालयातील आपिलार्थी विरुद्धचा संपूर्ण खटला रद्द केला आहे.





