5 ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी कायदा आणि सुव्यवस्था आवश्‍यक

गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीचा 70 वा दीक्षांत सोहळा संपन्न

नवी दिल्ली  – आज देशासमोर दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, सायबर गुन्हेगारी रोखण्याबरोबरच शेजारील देशांनी निर्माण केलेले संकट आहे. जोपर्यंत देश अंतर्गत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत विकसित होत नाही. पंतप्रधानांचे 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची आवश्‍यकता आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

शाह यांनी आज हैदराबाद येथील सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीच्या 70 व्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केले. ते म्हणाले, सरदार पटेल यांच्या नावाने असलेल्या अकादमीच्या आजच्या दीक्षांत सोहळ्यानंतर 103 पोलीस अधिकारी आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत असल्याबद्दल शहा यांनी आनंद व्यक्‍त केला आणि या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
हैदराबाद एक ऐतिहासिक जागा आहे, ज्याठिकाणी ही पोलीस अकादमी आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 630 पेक्षाही अधिक संस्थांनांचे देशात विलीनीकरण झाले. मात्र, हैदराबादचा निजाम भारतात विलीनकरणास तयार नव्हता. सरदार पटेल यांनी ऐतिहासिक पोलीसी कारवाईच्या माध्यमातून हैदराबाद, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भाग देशाशी जोडला.

अमित शाह यांनी सरदार पटेलांना श्रद्धांजली देत पुढे म्हटले की, कलम 370 मुळे जम्मू-काश्‍मीर 630 संस्थांनांसारखा देशात विलीन झाला नाही. त्यामुळे तेंव्हापासून प्रत्येकाला वाटत होते की, काही तरी अपूर्ण राहिले आहे. हे कार्य आज पंतप्रधान आणि देशाचे लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्यात आले. भारतीय संसदेने कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्‍मीरला भारताचा अविभाज्य घटक बनवले.

अमित शाह पुढे म्हणाले की, सरदार पटेल यांनी भारतीय पोलीस सेवेला भ्रष्टाचारमुक्त भारताची निर्मिती करण्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे आज जे अधिकारी भारतीय पोलीस सेवेत रुजू होत आहेत, त्यांनी सरदार पटेल यांची अपेक्षा लक्षात ठेवावी.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×