Lavani Censorship: अश्लील डीजे लावणीवर राज्य शासनाचा चाप! लावणी-तमाशासाठी स्वतंत्र नियमावली तयार…वाचा सविस्तर
Lavani Censorship: सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव किरण कुलकर्णी आणि सुरेखा पुणेकरांसह कलावंतांच्या बैठकीत स्वतंत्र नियमावलीवर शिक्कामोर्तब.

Lavani Censorship – महाराष्ट्रातील लोककला, लावणी-तमाशा, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, राज्यभर वाढत चाललेल्या अश्लील डीजे लावणी कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच लावणी, तमाशा आणि संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सेन्सॉर बोर्डाची पूर्वपरवानगी अनिवार्य करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव किरण कुलकर्णी यांच्यासमवेत सोमवारी (दि. 21) झालेल्या बैठकीत या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, रेश्मा परितेकर, मोहित नारायणगावकर, नारायण जवळेकर, नितीन धावणे पाटील तसेच अभिनेत्री अपेक्षा चव्हाण उपस्थित होत्या. बैठकीत पारंपरिक लावणी,
तमाशा आणि लोककलेचे जतन करताना अश्लीलतेला आळा घालण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लोककलावंत, तमाशा मंडळे आणि संबंधित संघटनांकडून सूचना व अटी मागविण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सेन्सॉर बोर्डामार्फत लावणी सादरीकरणासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असून, संगीत बारी व कला केंद्रांमध्ये होणार्या अश्लील डीजे नृत्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथके कार्यरत राहणार आहेत.
बैठकीत लोककला आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित अन्य महत्त्वाच्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. लुप्त होत चाललेल्या टुरिंग टॉकीजना आर्थिक अनुदान व पुनरुज्जीवन योजना, बंद पडत असलेल्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांसाठी विशेष आर्थिक पॅकेज व करसवलती, लोकशाहीर विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाच्या उभारणीसह त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे,
तसेच दादासाहेब फाळके स्मारकाच्या विकासाबाबतही चर्चा झाली. याशिवाय चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजच्या चित्रीकरणावेळी कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणार्या अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारण्याचा तसेच महाराष्ट्राला चित्रपट चित्रीकरणासाठी अधिक आकर्षक केंद्र बनविण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक विचारविनिमय झाला.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
1.प्रत्येक जिल्ह्यात अश्लील डीजे लावणी रोखण्यासाठी भरारी पथके.
2.लावणी-तमाशासाठी स्वतंत्र नियमावली तयार होणार.
3.सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सेन्सॉर बोर्डाची पूर्वपरवानगी अनिवार्य.
4.टुरिंग टॉकीज व सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष योजना.
5.लोकशाहीर विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची संकल्पना.
6.चित्रपट चित्रीकरणासाठी सुलभ परवानगी प्रक्रिया व स्थानिक कलाकारांना प्राधान्य.





