कॉंग्रेसच्या “घर घर गॅरंटी” मोहिमेची सुरूवात – मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अयशस्वी ठरली आहे. ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतच नाही, असा आरोप करत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या “घर घर गॅरंटी” मोहिमेची सुरूवात केली. ही मोहिम देशभरातील आठ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेचा शुभारंभ खर्गे यांनी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उस्मानपूर, कैथवाडा येथे केला. यावेळी काँग्रेसच्या “पांच न्याय, पचीस हमी” पत्रकांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसची प्रचाराची टॅगलाइन “हाथ बदलेगा हालत” अशी ठेवण्यात आली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, “घर घर गॅरंटी”ची सुरुवात अशा ठिकाणाहून केली जात आहे, जिथून 1978 मध्ये काँग्रेसने पहिल्यांदा “हात” चिन्हाचा वापर केला होता. कॉंग्रेस हमी देतो की आमच्या सरकारने नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी काम केले आहे आणि ते नेहमीच करत राहिल. दुसरीकडे ‘मोदी की गॅरंटी’ पूर्ण फसली असून लोकांना कोणताही फायदा मिळू शकला नाही.
मोदींनी वर्षभरात दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु लोकांना त्या नोकऱ्या कधीच पाहायला मिळाल्या नाहीत. आता लोक अशा खोटया प्रचाराला बळी पडणार नाहीत. सत्ताधारी भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याविषयी आणि पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) साठी कायदेशीर हमी देण्याविषयी बोलतो.
परंतु त्या आश्वासनांचे पालन केले नाही. आम्ही देशाला सांगू इच्छितो की आम्ही जे वचन देतो ते आम्ही पूर्ण करू, खर्गे यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस सरकारने मनरेगा, आरटीआय, अन्नाचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यांसारख्या हमी आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबवित गरीबातील गरीबांना लाभ मिळवून दिला आहे. आम्ही त्या लोकांना सांगू इच्छितो की जनतेला लोकशाही हवी आहे आणि संविधानाचे रक्षण करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.





