Latur ZP Election : भाजपला मोठा धक्का ! लातूरमध्ये सुनेत्रा पवार ठरणार किंगमेकर; काय आहे सत्तेचं समीकरण?
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील निकालांनी (Latur ZP Election) राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. २०१७ च्या निवडणुकीत ३६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदा मोठा फटका बसला आहे.

Latur ZP Election : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील निकालांनी (Latur ZP Election) राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. २०१७ च्या निवडणुकीत ३६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदा मोठा फटका बसला आहे.
पक्ष केवळ १८ जागांवर मर्यादित राहिला आहे. दुसरीकडे काँग्रेसने आपली ताकद वाढवत 15 जागांवरून 23 जागांवर झेप घेतली आहे आणि जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आली आहे. अजित पवार गटाची राष्ट्रवादीही ५ जागांवरून १२ जागांवर पोहोचली आहे.
इतर पक्षांची स्थिती अशी आहे:
– एकनाथ शिंदे गटाची शिवसेना: १ जागा
– उद्धव ठाकरे गटाची शिवसेना: १ जागा
– शरद पवार गटाची राष्ट्रवादी: १ जागा
– मनसे: १ जागा
– अपक्ष: २ जागा
भाजपला राष्ट्रवादीची मदत आवश्यक
२०१७ मध्ये स्वबळावर सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदा एकट्याने बहुमत मिळाले नाही. भाजप (१८) आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी (१२) मिळून ३० जागा होतात, जे नेमके बहुमत आहे. शिवाय एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेची एक जागा आणि दोन अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरेल. अपक्ष कुणाला साथ देतील, यावर सत्ता स्थापनेचे गणित अंतिम होईल.
तालुकानिहाय युती आणि लढत
लातूर जिल्ह्यात अहमदपूर, जळकोट आणि उदगीर या तीन तालुक्यांमध्ये भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी युती झाली होती. उर्वरित तालुक्यांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. एकनाथ शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली होती.
पक्षांची लढवलेल्या जागा आणि कामगिरी
– काँग्रेस: ५३ जागांवर लढली, २३ जागा जिंकल्या
– भाजप: ५० जागांवर लढली, १८ जागा जिंकल्या
– राष्ट्रवादी (अजित पवार): २६ जागांवर लढली, १२ जागा जिंकल्या
– राष्ट्रवादी (शरद पवार): ९ जागांवर लढली, १ जागा जिंकली
– शिवसेना (एकनाथ शिंदे): ३१ जागांवर लढली, १ जागा जिंकली
– शिवसेना (उद्धव ठाकरे): ९ जागांवर लढली, १ जागा जिंकली
२०१७ च्या तुलनेत भाजपची घसरण स्पष्ट दिसते, तर काँग्रेस आणि अजित पवार गटाने मजबूत पुनरागमन केले आहे. सत्तास्थापनेच्या हालचाली आता वेग घेण्याची शक्यता आहे, ज्यात अपक्ष आणि लहान पक्षांच्या पाठिंब्यावर सर्वकाही अवलंबून राहील. लातूर जिल्ह्यातील हे निकाल राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम टाकू शकतात.






