नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

लातूर : लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मन्याड नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अनिल नागरगोजे व तुषार पवार असे पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान रविवारी सुटी असल्याने सायंकाळी अनिल नागरगोजे (वय १७) आणि तुषार पवार (वय १७) यांच्यासह त्यांचा एक मित्र असे (Latur) तिघेजण पोहण्यासाठी मन्याड नदीपात्रात उतरले होते. दरम्यान पोहत असताना नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिसरा मित्र बचावला आहे.
त्याने आपले मित्र पाण्यात बुडाल्याची माहिती गावात दिली. यानंतर गावातील नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस आणि या मुलांच्या नातेवाईकांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत अनिल नागरगोजे व तुषार पवार या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचा शोध घेतल्यानंतर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालय पाठवण्यात आले.





