लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांंनी स्वत:वरच झाडली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

Latur News | लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी रात्री उशिरा घडलेलेल्या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या घरात त्यांनी शनिवारी रात्री ११: ३० वाजता डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोळीचा आवाज झाल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रुमकडे धाव घेतली. बाबासाहेब मनोहरे यांनी पिस्तुलमधून गोळी झाडल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार गेली. त्यामुळे रक्तस्राव सुरु झाल्याने त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू झाले.
या घटनेनंतर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जात आयुक्तांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. भाजप नेत्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे अनेक माजी नगरसेवक यांनी हॉस्पिटलला भेट देत बाबासाहेब मनोहरे यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेतले. या घटनेनंतर लातूर महानगरपालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगितले जात आहे.
आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. नेहमीप्रमाणे घरच्यांसोबत जेवण झाल्यावर ते स्वतःच्या रूमकडे गेले. काही वेळानंतर त्यांच्या रुममधून गोळी झाडल्याचा आवाज आला.
बाबासाहेब मनोहरे कोण आहेत?
बाबासाहेब मनोहरे यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. नांदेड येथे त्यांनी अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या लातूर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा:




