Latur Murder Case : लातूर शहरात खुनाच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भर रस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना आमदार अमित देशमुख यांच्या समोर घडली आहे. नेमकं काय घडलं? निवडणूक प्रचार सभा आटोपून बाभळगावकडे निघाले असताना, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आमदार अमित देशमुख यांच्या वाहनासमोरच एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांनी तत्काळ गाडी थांबवून पोलिसांना माहिती दिली व जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. मात्र उपचारादरम्यान प्रज्वल उर्फ गोट्या संजय मस्के (वय २१) याचा मृत्यू झाला. जुन्या वादातून मित्राकडूनच खून प्रज्वल मस्के हा आपल्या चुलत भावासोबत आंबेडकर चौक परिसरात थांबलेला असताना, ओळखीचे गणेश गायकवाड आणि भिमा सूर्यवंशी हे दोघे तेथे आले. जुन्या वादातून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. “तू लय दिवसांपासून माझ्या डोक्यात बसलास,” असे म्हणत गणेश गायकवाड याने कमरेतील धारदार चाकू काढून प्रज्वलच्या छाती, पोट, बरगडी व मानेवर सपासप वार केले. एकामागून एक घाव बसल्यानंतर प्रज्वल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. “गोट्याची विकेट पडली, पळ…” असे म्हणत दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. चुलत भावाने दिली थरारक माहिती प्रज्वलचा चुलत भाऊ आतिश मस्के याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नशेत होते. दोघांच्या हातात कोयता व सुरा होता. प्रज्वल पूर्वी राजकारणात सक्रिय असल्याने त्याचाही राग आरोपींच्या मनात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पहाटे दोन्ही आरोपी अटकेत या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पहाटे २.३० वाजता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार अमित देशमुख यांनी घटना पहाताच गाडी थांबवली. जखमी प्रज्वलला रिक्षातून रुग्णालयात पाठवून, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांशी संपर्क साधत तातडीच्या उपचारांच्या सूचना दिल्या. तसेच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. गुन्हेगारीविरोधात काँग्रेसचे निवेदन लातूर शहर व जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.