BMW Accident : जिल्ह्यातील औसा शहराजवळ औसा‑तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव BMW कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक व कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. सांगली येथील (एमएच 04 ईजी 7500) ही कार काही कामानिमित्त लातूर येथे आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण करून सहकाऱ्याला सोडण्यासाठी कार औसाकडे जात होती. त्यावेळी पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रक (एमएच 25 यू 0522) आणि एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) कारने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की लाकूड वाहतूक करणारा ट्रक सुमारे १०० फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात धनराज काशीनाथ जाधव (४९, रा. सांगली), आबासाहेब साळुंके (३६), शुभम शेषेराव पाटील (२६) आणि किसन रामलिंग साळुंके (४९, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जयहिंद विश्वास जाधव (३०, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (२८, रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच औसा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. समृद्धी महामार्गावरही अपघात; 3 कामगारांचा मृत्यू दरम्यान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरही शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाथनगर (वडखा) परिसरात दुभाजकावरील क्रॅश बॅरिअर प्लेट बदलण्याचे काम सुरू असताना सुसाट वेगातील कंटेनरने सर्व्हिस ट्रकला धडक दिली. या धडकेत ट्रकच्या आडोशाला बसलेल्या तीन कामगारांना कंटेनरने चिरडले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी १.३० वाजता घडला.