राजगुरुनगर – राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरविंद गायकवाड यांचा प्रचार जोर धरू लागला आहे. उपसरपंच ते लोकाभिमुख कार्यकर्ते असा त्यांचा प्रवास असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत प्रश्न सोडविण्याची शैली यामुळे त्यांना शहरातील मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. उपसरपंचपदाचा अनुभव आणि लोकाभिमुख कार्यशैली अरविंद गायकवाड यांनी राजगुरूनगर ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून कार्यरत असताना पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सोयी, गटारव्यवस्था यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले. नागरिकांना अडचण आल्यास त्वरित धाव घेणारे, दुःखाच्या प्रसंगी मायेचा हात देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख मजबूत झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकामध्ये त्यांचा सहज संवाद, मदत करण्याची तयारी आणि साधेपणामुळे गायकवाड यांचा ‘बोलबाला’ असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शन – विकासाला चालना शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड यांनी गेल्या काही वर्षात विकासात्मक कामे केली. याच पाठींब्यावर शहराचा सर्वांगीण विकास साध्य करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गायकवाड यांनी शहरातील काही महत्त्वाच्या समस्यांवर पुढीलप्रमाणे उपाययोजना जाहीर केल्या आहेत : – पाणीपुरवठा प्रश्नाचा कायमस्वरूपी तोडगा – कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करणे – शहरातील प्रमुख ठिकाणी सुसज्ज सार्वजनिक शौचालये – मुख्य भागात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करून सुरक्षित शहर – स्वच्छता आणि आरोग्य प्राधान्य – ‘स्वच्छ राजगुरुनगर’ अभियान नवीन योजना : शहराचा भविष्यकालीन विकास आराखडा गायकवाड यांनी पुढील काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. – बारा खोल्या भागाचा सर्वांगीण विकास – वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी अंडरग्राउंड केबल लाइन – सार्वजनिक शौचालयांची उभारणी – ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती व बसण्याची सोय – आतापर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व मूलभूत समस्यांचे अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निराकरण कारकीर्द, जनविश्वास आणि शेवटची निवडणूक : गायकवाड दोन वेळा राजगुरुनगर ग्रामपंचायतीत निवडून आल्याचा उल्लेख करत म्हणाले, “माझ्या आणि माझ्या पत्नीच्या कार्यकाळात बाजारपेठेसह विविध भागात सेवा सुविधा दिल्या. काही प्रश्न अद्याप बाकी असले तरी आगामी काळात तेही सोडवणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. मतदारांनी दिलेल्या प्रेमामुळेच मला काम करण्याची उर्मी मिळाली. यावेळीही त्यांच्या पाठिंब्याचा ठाम विश्वास आहे.” राज्यात महायुतीची सत्ता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास साध्य करणार असल्याची ग्वाही देत गायकवाड यांनी मतदारांकडून विश्वासाचे मत देण्याचे आवाहन केले आहे.