पुणे – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामिष पार्ट्या जोरात सुरू आहेत. परिणामी, चिकन, मासळीला मोठी मागणी आहे. मटणालाही मागणी आहे. मात्र, ती नेहमीच्या तुलनेत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. विशेषत: केटरिंग, हॉटेल व्यवसायिकांकडून जास्त मागणी आहे. घरगुती ग्राहकांकडून होणारी खरेदी तुलनेने कमी आहे. महापालिका निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान असल्याने चिकनला सर्वाधिक मागणी आहे. याविषयी व्यापारी रुपेश परदेशी म्हणाले की, निवडणुकीमुळे मागणी वाढल्यामुळे चिकनच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे. किलोला सध्या २७० रुपये भाव आहे. रविवारी (दि.११) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून ६०० ते ६५० टन चिकनची विक्री झाली. नेहमीच्या रविवारच्या तुलनेत ही विक्री जास्त होती. नेहमीच्या रविवारी ४०० ते ५०० टन चिकनची विक्री होते. मासळीविषयी व्यापारी ठाकुर परदेशी म्हणाले, मासळीला मोठी मागणी आहे. परिणामी, सुरमईच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पापलेटच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात रविवारी (दि. ११) खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीच्या मासळीची सुमारे २०० ते ४०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून २० ते २५ टन इतकी आवक झाली. मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, मटणला नेहमीप्रमाणेच मागणी आहे. निवडणुकीमुळे अधिक मागणी नसून, मटणाला किलोला ८०० रुपये भाव मिळत आहे. निवडणुकीमुळे चिकनला मागणी वाढली असून येते दोन-तीन दिवस ही मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. – रुपेश परदेशी, चिकनचे व्यापारी