Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.! दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा संताप महाराष्ट्रात
Prakash Ambedkar : NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता केंद्र सरकारविरोधातील मोठ्या राजकीय संघर्षाचं रूप घेणार का, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

Prakash Ambedkar – दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता देशव्यापी राजकीय आंदोलनाचं स्वरूप येताना दिसत आहे. NEET-UG 2026 पेपरफुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या कारवाईनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईचे पडसाद आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले असून, विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आता ते दिल्लीतील आंदोलनस्थळी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या या लढ्याला महाराष्ट्रातूनही ताकद देण्याची भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. यापूर्वीच त्यांनी पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा केवळ राजकीय मुद्दा नसून देशाच्या तरुणाईच्या भविष्याशी संबंधित असल्याचं म्हटलं होतं.
प्रकाश आंबेडकरांची ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर आणि संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या कथित दडपशाहीविरोधात सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र यावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाची धग आता महाराष्ट्रातील शहरांपासून गावागावांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिल्लीतील आंदोलनाला विरोधकांचं बळ
दिल्लीतील आंदोलनाला आता प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांचंही समर्थन मिळत आहे. राहुल गांधी यांनी खासदारांसह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर दबाव वाढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
त्यांनी आंदोलकांकडून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आणि पोलिस कारवाईबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्याशीही चर्चा केली.
पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि आंदोलनादरम्यान झालेली पोलिस कारवाई या मुद्द्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. दरम्यान, सरकारच्या बाजूने आंदोलकांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातही आंदोलनाची ठिणगी
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी निदर्शने केली आहेत. मुंबईतही आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. आता प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
आता दिल्लीचा संताप महाराष्ट्राच्या रस्त्यावर?
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर देशभरातील विरोधक एकवटताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, शरद पवार जंतर-मंतरवर पोहोचले आणि प्रकाश आंबेडकरांनी थेट 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
त्यामुळे NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता केंद्र सरकारविरोधातील मोठ्या राजकीय संघर्षाचं रूप घेणार का, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.






