पुणे – महापालिकेची निवडणूक लढविणारे सगळेच उमेदवार सध्या धावपळीत आहेत. भेटीगाठी… पदयात्रा… प्रचारफेऱ्या यामध्ये दिवस कसा निघून जातो कळत नाही; पण यातून वेळ काढत काही उमेदवार आपले दैनंदिन कामही करत आहेत. प्रभाग क्रमांक २७ मधील भाजपचे उमेदवार महेश (ऊर्फ) अमर विलास आवळे हे प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढत सकाळी लवकर आपल्या आईला मदत करत असल्याचे दृश्य गुरुवारी बघायला मिळाले. आवळे यांची आई विमल आवळे या महापालिकेत आरोग्य विभागात स्वच्छता कर्मचारी म्हणून सेवेला आहेत. अमर नेहमीच आईच्या कामात मदत करत असतात. गुरुवारीही त्यांनी वेळ काढून रस्तेसफाईच्या कामात आईला मदत केली. हे पाहून अनेक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. आवळे यांची आई आंबिल ओढा येथील आरोग्य कोठीत नियुक्तीवर आहेत. ना. सी. फडके चौकाजवळील रस्त्यावर त्या काम करतात. त्यामध्ये अमर त्यांना मदत करतात. सध्या प्रचारामुळे त्यांची धावपळ सुरू असली, तरी ते वेळ काढून आईला मदत करतात. आपला मुलगा नगरसेवकपदाची निवडणूक लढवतो आहे, याचे विमल आवळे यांनाही कौतुक वाटते. आवळे यांनी गुरुवारी सकाळी दत्तवाडी भागात स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी सर्वांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी प्रभागातील भाजपच्या सर्व उमेदवारांची पदयात्रा काढण्यात आली.