Kolhapur – जिल्ह्यातील हुपरी येथे एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. नारायण भोसले आणि विजयमाला भोसले असे हत्या झालेल्यांची नावे आहेत. या दुहेरी हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा आरोपी सुनील भोसले (४८) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात हुपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भोसले गेल्या काही महिन्यांपासून घरवाटणीच्या मागणीवरून आई-वडिलांशी सतत वाद घालत होता. तसेच घराच्या वाटणीला आई-वडिलांनी विरोध केला होता. आई वडिलांनी घराची वाटणी नाकारल्याने वैतागलेल्या सुनीलने शुक्रवारी पहाटे साधारण साडेपाचच्या सुमारास आपल्या आई वडिलांची हत्या केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, पहाटेच्या सुमारास सुनीलने झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर आधी काठीने वार केला. त्यानंतर दगडाने जोरदार प्रहार केला. त्यानंतर खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तेवढ्यात घरात प्रवेश करत असलेल्या आई विजयमाला यांच्या डोक्यातही काचेच्या तुकड्याने घाव घातला. तसेच आईच्याही हाताची नस कापली. त्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सुनील थंड डोक्याने घराच्या बाहेर आला आणि त्यानंतर त्याने हुपरी पोलिस ठाणे गाठले. त्याने पोलिसांसमोर शरण येत आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.