Pune News : दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; पुण्यात 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Pune News : त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पुणे: पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना त्याचा काही भाग अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मृत महिलेचे नाव सलमा सलाउद्दीन पठाण असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री विघ्नहर्ता मंडळाचा दहीहंडी उत्सव संपल्यानंतर कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होते. (Pune News)
याचवेळी लोखंडी सांगाड्याचा एक भाग अचानक सलमा यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबीयांचा मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार (Pune News)
या घटनेनंतर एक वेगळी बाब समोर आली आहे. मृत महिलेचा मुलगा संबंधित मंडळाशी जोडलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे मंडळातील इतर मुलांना किंवा तरुणांना अडचणीचा सामना करावा लागू नये, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
तसेच पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंतीही कुटुंबीयांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.





