Kolhapur – कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. भरधाव कारने तिघांना चिरडले. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताचा पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात हा भयंकर अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास तिघेजण तावडे हॉटेल चौकात शेकोटी करून रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते. त्याच वेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने या तिघांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना अपघाताची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले. तिघांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.