स्व. निवृत्तीशेठ शेरकर हे समाजाचे दीपस्तंभ – डॉ. गिरीश ओक यांचे गौरवोद्गार

ओझर : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी समाजसेवेच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्या कार्याला दीपस्तंभाची उपमा देत, विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर हे त्याच मार्गाने पारदर्शकपणे कारखाना सांभाळत असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी काढले. स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या १८व्या आणि पत्नी स्व. हिराबाई शेरकर यांच्या १६व्या पुण्यस्मरणानिमित्त शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.
या प्रसंगी व्हाईस चेअरमन अशोक घोलप, नंदुकाका शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, माजी आमदार बाळासाहेब दांगट, आशाताई बुचके, सुमित्राताई शेरकर, योगिताताई शेरकर, राजश्रीताई बोरकर, शरदराव लेंडे, बबनराव थोरात, तान्हाजीशेठ बेनके, माऊलीशेठ खंडागळे, ह.भ.प. गंगाराम डुंबरे, अंकुश आमले, गणेश कवडे, समीर शेरकर, अभिजीत शेरकर, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह कारखान्याचे आजी-माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, शिरोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, सत्यशील शेरकर यांचा मित्रपरिवार, कारखान्याचे अधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेरकर कुटुंबीयांतर्फे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
पारदर्शक कारभार आणि शेतकरीहित –
प्रास्ताविकात सत्यशील शेरकर म्हणाले की, स्व. निवृत्तीशेठ यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी पुण्यस्मरण समारंभ आयोजित केला जातो. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे चालवला जात असून, शेतकरीहिताचे निर्णय घेतले जात आहेत. यंदा कारखान्याचे विस्तारीकरण झाले असून, पुढील गळीत हंगामात ऊस तोड वेळेत होईल. तसेच, एफ.आर.पी.पेक्षा जास्त ऊस दर आणि दुसरे पेमेंट पुढील महिन्याच्या अखेरीस देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आदरांजली आणि स्मृतींना उजाळा –
शरदराव लेंडे, बबनराव थोरात, आशाताई बुचके, तान्हाजीशेठ बेनके, माऊलीशेठ खंडागळे, गंगाराम डुंबरे यांनी स्व. निवृत्तीशेठ यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते स्व. निवृत्तीशेठ आणि स्व. हिराबाई यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. भास्कर घुले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन लक्ष्मण शेरकर यांनी केले, तर आभार अशोक घोलप यांनी मानले.





