Mahayuti : महायुती सन्मवय समितीची रात्री उशिरा बैठक; विधिमंडळ समितीचा ‘फॅार्म्युला’ ठरला, अशी आहे रचना, पण महामंडळाबाबत रस्सीखेच सुरूच…

मुंबईः ३ मार्चपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशला सुरुवात झाली. आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आधीचे दोन दिवस वादळी ठरले. विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विधानसभेचे कामकाज सुरू होण्याअगोदरच विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॅार्म्युला ठरला आहे.
त्यानुसार भाजपला ११, शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४ असा फॅार्म्युला असल्याचे समजते. तर उर्वरित सात समितींबाबत निर्णय बाकी होता. या जागा अपक्षांसाठी ठेवल्याची माहिती आहे. यातील ११ महत्त्वाच्या समित्यांवर भाजप आमदारांची वर्णी लागली आहे. या बैठकीला भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे हे नेते बैठकीसाठी उपस्थित होते.
या समित्यांमध्ये लोकलेखा समिती, आहार व्यवस्था समिती, धर्मदाय समिती, अनुसूचित समिती, विशेष हक्क समिती, मानव हक्क समिती तसेच आश्वासन या समित्यांमधून मंत्रीपद हुकलेल्या आमदारांचे पुनवर्सन केले जाणार आहे.
📌 महायुती समन्वय बैठक
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रवासीयांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने महायुतीची समन्वय बैठक आज महाराष्ट्राचे… pic.twitter.com/N8hsiNW5A3
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) March 4, 2025
महामंडळाबाबत रस्सीखेच सुरूच
या बैठकीनंतर आता पुन्हा एक बैठक बोलावली जाणार आहे. कारण आता झालेल्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या महामंडळांबाबत चर्चा झाली. मात्र, अजूनही यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढच्या बैठकीत अंतिम महामंडळाची यादी ठरणार आहे. यामुळे महत्वाच्या महामंडळावर कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच जिल्हा निहाय समितीवरही त्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेच्या आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
मंत्री पदाचे वाटप करताना अनेक आमदारांना आपली मंत्रीपदी वर्णी लागेल असे वाटत होते. मात्र, अनेकांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही. यामुळे नाराज झालेल्या आमदारांना विविधमंडळ समित्यामधील महामंडळाचे वाटप करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे.





