“काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी नरेंद्र मोदींविरोधात कट रचला होता”

नवी दिल्ली : गुजरात दंगल प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यां तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जाला गुजरात पोलिसांकडून विरोध करण्यात आला आहे. गुजरात दंगलीनंतर भाजपा सरकार पाडण्यासाठी एका मोठा कट रचण्यात आला होता. त्यात तीस्ता सेटलवाड यांचा देखील समावेश होता, असा दावा गुजरात पोलिसांकडून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. यात २००२ च्या गुजरात दंगलीनंतर भाजपा सरकार बरखास्त करण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून एक मोठा कट रचण्यात आला होता. तीस्ता सेटलवाड देखील या कटात सहभागी होत्या, असे म्हटले गेले आहे.
हा कट रचताना सेटलवाड यांचा उद्देश निवडून आलेले सरकार बरखास्त करणे किंवा अस्थिर करणे हा होता. त्यासाठी त्यांनी अनेकांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्याच्या प्रयत्न केला. यासाठी त्यांना राजकीय पक्षाकडून आर्थिक मदतही मिळाली, असेही एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून, सेटलवाड यांना २००२ मध्ये गोध्रा नंतरच्या दंगलीनंतर ३० लाख मिळाले, असा दावाही एसआयटीने केला आहे.
२००२ च्या गुजरात दंगल प्रकरणी अनेकांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्याच्या आरोपाखाली अहमदाबाद गुन्हे शाखेने दोन व्यक्तींना अटक केली होती. यामध्ये सेटलवाड यांचाही समावेश होता.




