Lata Mangeshkar : लता दीदींचा खास VIDEO व्हायरल.! चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; ते शब्द ऐकून चाहते भावुक!

Lata Mangeshkar – भारताची गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांचा आवाज आणि त्यांच्या आठवणी आजही कोट्यवधी भारतीयांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या गाण्यांपासून ते आयुष्यातील खास आठवणींपर्यंत प्रत्येक गोष्ट चाहत्यांसाठी अनमोल आहे.
अशातच दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने लतादीदींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये त्या स्वतः चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा देताना दिसत असून भारतीय लष्करातील जवानांबद्दलचे प्रेमही व्यक्त करत आहेत.
हा व्हिडीओ लता मंगेशकर यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आल्याने अनेक चाहत्यांना क्षणभर त्या पुन्हा आपल्यात परतल्याचा भास झाला. व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले असून कमेंट्समधून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
लतादीदींचे शब्द मनाला भिडले!
या व्हिडीओमध्ये लता मंगेशकर दिवाळी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसतात. त्या म्हणतात, ‘नमस्कार, तुम्हा सर्वांना दिवाळी आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या भाऊबीज आहे. मी आपल्या भारतीय लष्करातील जवानांना प्रणाम करते. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, मी त्यांची बहीण आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे.’
पुढे त्या भारतीय जवानांच्या सुखी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसतात. आपले जवान नेहमी आनंदी राहावेत आणि देवाने त्यांना दीर्घायुष्य द्यावे, अशी भावनाही त्या व्यक्त करतात. भाऊबीजेच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना त्यांनी दिलेला हा प्रेमाचा संदेश अनेकांच्या मनाला स्पर्श करणारा ठरत आहे.
लतादीदींचा देशभक्तीचा संदेश चर्चेत
या व्हिडीओमधील सर्वाधिक लक्षवेधी भाग म्हणजे भारतीय जवानांबद्दल लतादीदींनी व्यक्त केलेली भावना. त्या म्हणतात, ‘जर भारतीय जवान आहेत, तर भारत देश आहे. भारत देश आहे, म्हणून आपण आहोत. अन्यथा आपण कुणीच नाही.’
त्यांच्या या शब्दांतून देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र तैनात असलेल्या जवानांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता दिसून येते. विशेष म्हणजे, भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जवानांना आपले भाऊ मानत व्यक्त केलेल्या भावना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
‘क्षणभर वाटलं लतादीदी परत आल्या’; चाहत्यांच्या भावुक प्रतिक्रिया
लतादीदींचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, ‘एका क्षणासाठी मला वाटलं तुम्ही आहात.’ तर दुसऱ्या युजरने, ‘अचानक हा व्हिडीओ पाहून लतादीदी पुन्हा परत आल्यासारखं वाटलं,’ अशी भावना व्यक्त केली.
अनेकांनी त्यांच्या आवाजाची, साधेपणाची आणि देशभक्तीची आठवण काढली आहे. लतादीदींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला पसंती मिळत आहे.
२०२४ मधील जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल; २०२२ मध्ये घेतला होता अखेरचा निरोप
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नवीन नसून यापूर्वी २०२४ मध्येही शेअर करण्यात आला होता. लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला.






