भाषाच ही निकामी, शब्दासही पुरेना…; संसार २० दिवसाचा मात्र घटस्फोटासाठी निर्माण झाल्या होत्या कायदेशीर अडचणी

विजयकुमार कुलकर्णी
पुणे– दोघेही मूकबधिर… एकमेकांना अनुरूप असल्याने दोघांही विवाह करण्याचे ठरवले. तीर्थक्षेत्री आळंदी येथे दोघांचा विवाह झाला. मात्र, विवाहानंतर एकमेकांचे जमेना. अवघ्या २० दिवसांत पत्नी घर सोडून निघून गेली. आता या दाम्प्त्याच्या कायदेशीर घटस्फोटासाठी वेगळीच समस्या उभी राहिली. दोघांनी वकील दिला. पण या दोघांचे म्हणणे न्यायालयापर्यंत पोहोचवण्यासाठी एका अनुवादकाची गरज पडली.
अनुवादकाला द्यायला पैसे नव्हते. मग यावर उपाय म्हणून, ज्या पालकांनी या दाम्पत्याला लहानाचे मोठे केले, त्यांनाच अनुवादक म्हणून पाचारण केले गेले आणि मग सर्वच कायदेशीर प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. दोघांचा परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर झाला. सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.व्ही.फुलबांधे यांनी हा आदेश दिला. दोघांच्या वतीने अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. युवराज खाटपे व अॅड. वृषाली नवले यांनी सहाय्य केले.
माधव (वय २६) आणि माधवी (वय २४) (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावी आहेत. दोघेही शिक्षित आहेत. त्याचा आयटीआय झाला आहे. तर ती बारावी शिकली आहे. दोघांचा विवाह ३० मार्च २०२३ रोजी झाला. ती नांदायला गेली. मात्र, स्वभाव, आवड-निवड यांच्यातील तफावतीमुळे अवघ्या काही दिवसात दोघांचे पटेनासे झाले. नातेवाईक, मित्रमंडळी आणि घरच्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. २० एप्रिलपासून ती कायमची माहेरी निघून गेली. त्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला होता. मुख्य अडचण होती ती भाषेची. भाषाच ही निकामी, शब्दासही पुरेना…असे कवी ग्रेस म्हणतात. त्याचा पूर्ण प्रत्यय या प्रसंगातून दिसून येतो.
यामुळे दावा दाखल करण्यास झाला दोन महिने विलंब
मूकबधिर दांपत्याची भाषा न्यायालयाला समजणार तर कशी ? असा प्रश्न निर्माण झाला होता. मूकबधिरांची भाषा सांगणारे अनुवादक आहेत. वकिलांनी त्यांच्याशी संपर्कही साधला. मात्र, प्रत्येक तारखेला हजर राहण्यस त्यांनी शुल्क मागितले. ते हजारो रुपयांमध्ये आहे. या दांपत्यला ते देणे शक्य नव्हते. त्यामुळे दावा दाखल करण्यास दोन महिने झाला विलंब झाला. अखेर वकिलांना सुचले. त्यांनी आई-वडिलांनाच अनुवादक करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. तो अर्ज मंजुर झाल्यानंतर दावा चालण्याचा निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला.
दोघांचे वय जास्त नाही. एक महिन्याचा संसारही केलेला नाही. त्यातच अनुवादासाठी केस लांबली असती तर दोघांचाही वेळ गेला असता. त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दोघांना आणखी थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे दोघांच्याही घटस्फोटातील अडचणी दुर झाल्या. जरी मूकबधिर असले तरीही दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.” – अॅड.भाग्यश्री मुळे-गुजर, दांपत्याच्या वकील .





