Sikkim News : सिक्कीममध्ये भूस्खलन.! ३ लष्करी जवानांचा मृत्यू; ६ जवान बेपत्ता

Sikkim – सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्याचा तडाखा एका लष्करी छावणीला बसला. त्या दुर्घटनेत लष्कराचे ३ जवान मृत्युमुखी पडले. तर, ६ जवान बेपत्ता असल्याचे समजते.
सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांत मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशात सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भूस्खलन घडले. त्या दुर्घटनेवेळी लष्करी छावणीवर दरडी कोसळल्या. त्यामध्ये झालेल्या जीवितहानीची माहिती सोमवारी समोर आली.
त्यानुसार, लष्कराचे हवालदार लखविंदर सिंग, लान्स नायक मुनिश ठाकूर आणि पोर्टर अभिषेक लाखडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर ४ जवान किरकोळ जखमी झाले. दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या जवानांच्या शोधासाठी युद्धपातळीवर कार्य हाती घेण्यात आले आहे.
मंगन जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकही अडकून पडले. त्यांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी व्यापक मोहिमही हाती घेण्यात आली आहे. त्या मोहिमेत पोलीस, लष्कर आणि इतर यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. संबंधित मोहिमेवर जिल्हा प्रशासन देखरेख ठेऊन आहे.





