Land Ownership: शासनच सांगणार जमिनीची मालकी
Land Ownership:

लँड टायटलिंग ॲक्ट विधेयक मांडणार येत्या अधिवेशनात
– मालमत्तांचे हक्क होणार निश्चित
Land Ownership: राज्यातील मालमत्तांचे हक्क निश्चित करण्यासाठी आणि जमिनींच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी लँड टायटलिंग ऍक्ट आणला जाणार आहे. यामुळे जमिनीचे मालकी हक्क अधिकृत आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे जमीन व्यवहार पारदर्शक होऊन गैरव्यवहारांना आळा बसणार आहे.
लँड टायटलिंग विधेयक पुढील महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात मांडले जाणार असून, या विधेयकामुळे आता राज्य सरकारच जमिनीचा मालक कोण आहे, सांगणार आहे. यामध्ये मालकी हक्काला बाधा येणार नाही, तसेच मालमत्तेचे संरक्षण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.
जमिनीची अचूक नोंदणी करणे, मालमत्तेची बेकायदेशीरपणे होणारी विक्री रोखणे व मूळ मालकी हक्क आश्वासित करण्यासाठी महाराष्ट्र लँड टायटलिंग विधेयक तयार करण्यास २०१४ पासून सुरुवात झाली. त्यानुसार भूमिअभिलेख विभागाने हे विधायक तयार करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविले होते.
त्यावर महसूल, विधी व न्याय विभागाने काही त्रुटी काढून काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या. त्यानुसार भूमिअभिलेख विभागाकडून विधयेकामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करून पाठविण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारच्या पातळीवर ते अंतिम करण्यात आले आहे.
मागील १२ वर्षांपासून या विधेयकाची चर्चाच होत होती. मात्र, आता हे विधेयक अस्तित्वात येणार आहे. प्रगत देशांमध्ये शासनच जागेची मालकी कोणाकडे आहे ते सांगते, त्याच धर्तीवर हे विधेयक येत्या अधिवेशनात मांडले जाणार आहे. या वृत्तास मंत्रालयातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
अनेक सुधारणा प्रस्तावित
देशात सर्व्हे क्रमांकानुसार सध्या जमिनीचा प्रकार, क्षेत्र, स्थान अशी नोंद होते. मात्र, इमारती आणि सदनिका यांची अचूक नोंद होण्यासाठी या विधेयकामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. जेणेकरून खरेदी- विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता येऊन नागरिकांची होणारी फसवणूक टळेल. मालमत्तेच्या खरेदी- विक्री व्यवहारांमध्ये अडचणी उद्भवणार नाहीत. मालमत्ता हस्तांतरण, खरेदी -विक्री असे व्यवहार करतेवेळी न्यायालयीन दावे याबाबत माहिती देणे या दुरुस्तीनंतर आवश्यक होणार आहे. अशा अनेक सुधारणा जमीनविषयक विधेयकात प्रस्तावित करण्यात आल्या असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
…………..




