बिहार निवडणुकीच्या तोंडावर ‘राजद’मध्ये मोठा भूकंप! लालूंकडून मुलाचीच हकालपट्टी…

Lalu Prasad Yadav : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलात (RJD) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांना कुटुंबातूनही बेदखल केल्याची घोषणा लालू प्रसाद यादव यांनी केली. तेज प्रताप यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आणि कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून विचलित झाल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे लालू यांनी स्पष्ट केले.
तेज प्रताप यांचे वादग्रस्त वर्तन
तेज प्रताप यादव यांनी शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत खळबळ उडवून दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी अनुष्का यादव नावाच्या महिलेशी १२ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. “आम्ही आता ही गोष्ट सर्वांसमोर उघड करत आहोत,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि एक्सवर दुसरी पोस्ट टाकत आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला. या प्रकाराने राजदच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनमानसात संभ्रम निर्माण झाला.
तेज प्रताप यांचे असे वर्तन यापूर्वीही अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहे. पक्षातील नेत्यांशी वाद, विचित्र विधाने आणि बेजबाबदार वक्तव्यांमुळे ते कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक वर्तनामुळे लालू प्रसाद यादव आणि कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला आहे. विशेषतः, तेज प्रताप यांचा विवाह आणि त्यानंतरचा घटस्फोट यामुळेही यादव कुटुंब चर्चेत राहिले होते. पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही तेज प्रताप यांच्या वागण्याबद्दल नाराजीचा सूर आहे.
लालू प्रसाद यादव यांचे स्पष्टीकरण
लालू प्रसाद यादव यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून या निर्णयाची कारणे स्पष्ट केली. ते म्हणाले, “वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आम्ही करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. तेज प्रताप यांचे बेजबाबदार वर्तन, लोकांशी त्यांचे वागणे आणि कृत्ये ही आमच्या कौटुंबिक मूल्ये आणि संस्काराच्या विरोधात आहेत. त्यामुळे मी त्यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढत आहे. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे.”
लालू पुढे म्हणाले, “तेज प्रताप यांच्या वैयक्तिक जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यासाठी ते स्वतः सक्षम आहेत. त्यांच्याशी संबंध ठेवायचे की नाही, हे इतरांनी विवेकाने ठरवावे. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात लोकलज्जेचा पुरस्कार केला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनीही या मूल्यांचा स्वीकार केला आणि आचरणात आणला.”
बिहारच्या राजकारणात तेज प्रताप यांच्या निलंबनाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राजद हा बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. अशा वेळी पक्षनेत्याचा मुलगा आणि माजी मंत्री यांच्यावर अशी कारवाई पक्षाच्या अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. तेज प्रताप यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. आगामी निवडणुकीत हा निर्णय राजदच्या रणनीतीवर आणि मतदारांवरील प्रभावावर कसा परिणाम करेल, हे येणारा काळच ठरवेल.





