“भाजपची बिहारमधील सत्ता गेल्यानं अमित शहांना वेड लागलंय” – लालू प्रसाद यादव

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बिहारमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, भाजपची बिहारमधील सत्ता गेल्याने अमित शहा यांना वेड लागले आहे. त्यामुळे ते वेड्यासारखे बोलू लागले आहेत.
अमित शहा हे गुजरातमध्ये सत्तेवर असतानाच त्या राज्यात खरे जंगल राज होते. त्यामुळे त्यांनी बिहारमध्ये जंगल राज असल्याचा दावा करू नये असे ते म्हणाले. “अमित शाह बिलकुल पगले हुए हैं, “असे ते हिंदीत बोलताना म्हणाले.2024 मध्ये पुन्हा केंद्रात आणि त्यानंतर पुढच्या वर्षी बिहारमध्ये भाजप सरकार स्थापन करेल या गृहमंत्र्यांच्या दाव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ते आम्ही पाहू.
देशात विरोधी ऐक्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असेही लालूंनी यावेळी नमूद केले. त्यासाठीच ते उद्या रविवारी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. अमित शहा यांनी शुक्रवारी पुर्णिया येथील सभेत नितीश कुमार यांच्यावर टीका करताना नितीशकुमार यांनी भाजपच्या पाठीत वार केल्याचा आरोप केला होता. “कॉंग्रेस आणि आरजेडीच्या मांडीवर बसून ते पंतप्रधानपदाची स्वप्ने बघत आहेत असा आरोपही त्यांनी केला होता.





