लक्षवेधी : शिरोमणी अकाली दल सावरणार का?

– सचिन चौधरी
शिरोमणी अकाली दलाचे सर्वेसर्वा आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात अकाली दलाचा डोलारा त्यांचे पुत्र सुखबीर यांना पेलवणार का?
घरातील कर्ता पुरुष अचानक गेला की सगळेच थांबल्यासारखे वाटते. तो धक्का मोठा असतो. सगळ्याच वाटा बंद झाल्याचे भासू लागते. जे कुटुंबात तेच एखादी संस्था आणि राजकीय पक्षातही होते. राजकीय पक्षसुद्धा एक मोठे कुटुंबच असते. तेथे अनेक सदस्य जन्माने नाही तर विचारांनी एकत्र आलेले असतात. त्यांना जोडून ठेवणारा आणि योग्य दिशा दाखवणारा एक कर्ता पुरुष तेथे असतो. त्याला अध्यक्ष, नेताजी, समन्वयक, प्रमुख, सेनापती किंवा सर्वेसर्वा अशी वेगवेगळी विशेषणे असतात. त्याचा सार एवढाच असतो की तो त्या पक्षाचा भाग्यविधाता आहे. त्याचा शब्द तेथे अंतिम आहे.
त्याच्या दहशतीमुळे नाही तर त्याच्यावर असलेल्या अनुयायांच्या प्रेमामुळे आणि निष्ठेमुळे. प्रकाशसिंग बादल यांचे शिरोमणी अकाली दलात हेच स्थान होते. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रदीर्घ काळ ते राजकारणात होते. नेमक्या शब्दांत सांगायचे झाले तर 75 वर्षे. ते बादल आता अचानक गेल्यामुळे त्यांचा पक्ष पोरका झाला आहे. पंजाबच्या राजकारणाने सध्या ऐतिहासिक वळण घेतले आहे. त्याचवेळी बादल पक्षाला सोडून गेले आहे. पक्षापुढे मोठे आव्हान आहे. त्यातून तो कसा सावरतो हे आता पाहावे लागेल.
वयाच्या विशीत प्रकाशसिंग बादल पहिल्यांदा सरपंच झाले तर चाळीशीत मुख्यमंत्री. पंजाबचे सगळ्यात कमी वयाचे मुख्यमंत्री हा विक्रम त्यांनी केला आणि पाच वेळा राज्याची धुरा सांभाळली. राज्यातल्या कृषी, अर्थ, उद्योग या सगळ्यांच क्षेत्रांवर त्यांचा गेले अर्धशतक प्रभाव राहिला. माणसे जोडण्याची हातोटी आणि सगळ्यांना जोडून पुढे जाण्याची कला या गुणवैशिष्ट्यांमुळे ते इतकी वर्षे पंजाबचे नेतृत्व करू शकले. अगदी कट्टर विरोधकही बादलांपुढे विनम्र व्हायचा हा बादल यांच्या व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा होता. तब्बल 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याची किमया त्यांनी साधली. त्यांना कोणीच पराभूत करू शकत नाही हे सत्य विरोधकांनी स्वीकारले होते.
तथापि, आयुष्याच्या अखेरच्या निवडणुकीत त्यांना 12 हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. अकाली दल आणि कॉंग्रेस या दोनच पक्षांभोवती पंजाबचे राजकारण फिरत आले आहे. या दोन पक्षांनीच आलटून पालटून सत्ता उपभोगली. मात्र गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत या राज्याच्या राजकारणाने निर्णायक वळण घेतले. दिल्लीत स्थापन झालेला आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर आला आणि अकाली दल आणि कॉंग्रेसचे त्याने जवळपास नामोनिशाण मिटवले आहे.
प्रकाशसिंग बादल यांनी 2017 मध्येच पक्षाचे अध्यक्षपद सोडले होते. 20 वर्षे त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. त्यानंतर पक्षाची सूत्रे त्यांचे पुत्र सुखबीरसिंग बादल यांच्याकडे गेली. आतापर्यंतच्या निवडणुकांत शिरोमणी अकाली दलाचा पराभव जरी झाला तरी त्यांची हक्काची मते पक्की होती. बादलांनी आपला मतदार आपल्याशी घट्ट जोडून ठेवला होता. तथापि, आपच्या उदयामुळे हा मतदारही बादलांकडून हिरावला गेला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लोकसभेचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती.
त्या जागेवर विजय प्राप्त करून शिरोमणी अकाली दलाला पुन्हा वापसी करता आली असती. पण तेथे त्यांचा केवळ पराभवच झाला नाही तर उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. आता कॉंग्रेसच्या खासदाराच्या निधनामुळे लोकसभेची एक जागा रिक्त झाली आहे. तेथेही पोटनिवडणुकीची तयारी सुरू असताना अकाली दलाच्या संभाव्य उमेदवाराने पलटी मारत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बादल यांचा राज्यातील जनाधार संपला आहे का, अशी शंका यावी असेच एकूण वातावरण पंजाबमध्ये आहे. अशा काळात आता पित्याचे छत्र नसताना आणि मार्गदर्शन नसताना सुखबीर यांना पक्षाचा कारभार पाहावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून हा पक्ष सावरलेला नसतानाच त्यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे.
प्रकाशसिंग बादल यांच्या जाण्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहेच. पण त्याहीपेक्षा मोठी पोकळी पक्षात निर्माण झाली आहे. सुखबीर यांना ज्येष्ठ नेत्यांशी जुळवून घेत आणि त्यांचे मार्गदर्शन घेत पक्षाला पुढे न्यावे लागणार आहे. जनाधार परत मिळवावा लागणार आहे. सुखदेव सिंग धिंडसा आणि रणजीतसिंग ब्रह्मपुरा या दोन नेत्यांनी गेल्याच वर्षी बादलांच्या पक्षाला रामराम करत वेळी चूल मांडली आहे. मोठा नेता गेल्यावर आणि पक्षाची धुरा ज्या नेत्याकडे आहे त्याची पक्षावर पकड नसली की काय होते हे देशाच्या राजकारणात नवीन नाही. महाराष्ट्रात काय झाले, तमिळनाडूत काय झाले, कॉंग्रेसमध्ये इतकी वर्षे काय होते आहे हे सर्वज्ञात आहे. आपापल्या विभागात बलशाली असलेल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा जागृत होतात आणि ते मुख्य पक्षालाच आव्हान देतात. हे सगळ्या राज्यांमध्ये गेल्या दोन-पाच वर्षांत घडले आहे. तसेच शिरोमणी अकाली दलाच्या बाबतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रकाशसिंग बादल यांनी त्यांच्या हयातीतच मुलाला आणि सुनेलाही राजकारणात पुढे आणले होते. त्यांच्याकडे जबाबदाऱ्याही सोपवल्या आणि स्वत: फार्म हाउसमध्ये राहून मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेले होते. तथापि, या दोघांना लाल दिव्याच्या गाडीत राहूनही अद्याप आपले स्थान घट्ट करता आले नाही. एकहाती पंजाबचा निकाल बदलू शकतो अशी मुलाची आणि सुनेचीही प्रतिमा नाही. या परिवर्तनाच्या काळात चरणजीतसिंग अटवाल, कृपाल सिंग, बिबी उपींदरजीत कौर, मंतरसिंग ब्रार, जगबीरसिंग ब्रार, हरमितसिंग संधू अशी प्रबळ नेत्यांची फौज शिरोमणी अकाली दलाकडे आहे. स्वत: प्रकाशसिंग बादल यांनी या नेत्यांना घडवले आहे आणि बांधून ठेवले होते. ते आता सुखबीर यांना साथ देणार की कोणत्या प्रबळ पक्षाच्या सावलीत जाऊन उभे राहणार ते पाहावे लागेल.
नशिबाने बादल म्हणून सुखबीर यांचा जन्म झाला आहे. पण नशिबाला जर कर्तृत्व समजून त्यांनी निर्णय घेण्यास सुरुवात केली तर पंजाबवरही फुटीचे आणि नव्या प्रादेशिक पक्षांच्या स्थापनेचे ग्रहण लागण्याची टांगती तलवार असेल. त्याच्याकरता सुखबीर यांना आपल्या पित्याच्या आयुष्याचाच आता पुत्र म्हणून नाही तर एक पक्ष कार्यकर्ता म्हणून नव्याने अभ्यास करावा लागेल. त्यातून ते काय शिकतात आणि काय आत्मसात करतात यावरच त्यांचे आणि शिरोमणी अकाली दलाचे भवितव्य अवलंबून असेल.





