– प्रा. अविनाश कोल्हे
बलुची-पाक संघर्ष सहजासहजी संपणारा नाही. यामागे अनेक गुंतागुंतीची कारणं आहेत. यात एका बाजूला बलुची समाजाची अस्मिता आहे तर दुसरीकडे पाकिस्तान सरकारची अनास्था आहे.
पाकिस्तानची एका बाजूची सीमा जशी भारताला भिडलेली आहे तशीच दुसरीकडची सीमा इराण आणि अफगाणिस्तानला भिडलेली आहे. त्या भागातील पाकिस्तानचा प्रांत म्हणजे बलुचिस्तान. तेथे गेली अनेक वर्षे विघटनवादी लढा सुरू आहे. त्या विघटनवादी शक्तींनी जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. ही रेल्वेगाडी बलुचिस्तानची राजधानी क्वेटा स्टेशनहून पेशावरला जाते. ही गाडी पेहरोकुन्नरी आणि गदालार दरम्यान आली असताना बलुच बंडखोरांनी रेल्वेरूळावर स्फोट घडवला. या गाडीत सुमारे पाचशे प्रवासी होते.
बलुच बंडखोरांनी गाडीचा ताबा घेतला आणि प्रवाशांना ओलिस ठेवले. नंतर पाकिस्तानने तातडीने हालचाल करून परिस्थिती ताब्यात जरी घेतली तरी या ओलिसनाट्यात सर्व बलुच मारले गेले, ओलिसांपैकीसुद्धा काहींना मृत्यू आला. यासंदर्भात हेही नमूद केले पाहिजे की या हल्ल्याची जबाबदारी ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. बीएलएचा प्रवक्ता जियंद बलुच याने म्हटले आहे की आमची मागणी आमच्या साथीदारांना सोडण्याबद्दल होती. याला पाकिस्तान सरकारने प्रतिसाद दिला असता तर प्राणहानी टळली असती.आज जरी पाकिस्तानने दहशतवाद्यांना मात दिली असली तरी हा प्रश्न सुटलेला नाही, याचे भान ठेवलेले बरे. बलुचिस्तानची समस्या पाकिस्तानला जन्मापासून भेडसावत आहे. आता एकविसाव्या शतकात या समस्येने भीषण रूप धारण केले आहे.
याबद्दल इतिहास थोडक्यात माहिती असणे गरजेचे आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानचा जन्म झाला. मार्च 1948 मध्ये जेव्हा बलुची समाजाचे नेते खानसाहेब कराचीमध्ये होते तेव्हा बॅ. जिनांनी त्यांना बळजबरीने सामिल नाम्यावर सही करायला भाग पाडले. मात्र हा सामिलनामा बलुचिस्तानच्या विधानसभेने नाकारला व तेव्हापासून बलुचिस्तानची स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. पाकिस्तान निर्माण झाल्यापासून आजपर्यंत बलुची नेत्यांनी स्वायत्तता मिळवण्यासाठी अनेकदा जोरदार प्रयत्न केलेले आहेत. याअगोदर असा प्रयत्न 1973 साली झाला होता.
पाकिस्तानच्या लष्कराने पाशवी बळाचा वापर करून हा उठाव दडपला. दुसरा प्रयत्न 2006 साली झाला होता तर तिसरा प्रयत्न 2012 सालच्या मार्च महिन्यात झाला होता. आता गेले काही वर्षे या मागणीने पुन्हा डोकं वर काढले आहे. एकविसाव्या शतकात मात्र जागतिक राजकारण आमूलाग्र बदललेले आहे. परिणामी बलुची समाजाच्या लढ्याला अनेक आयाम प्राप्त झाले आहे. या प्रांतातील ग्वादर येथे पाकिस्तानने चीनच्या मदतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले आहे. यामुळे आता हजारो चिनी तंत्रज्ञ या भागात आढळतात. त्यांच्या बरोबरीने पाकिस्तानीसुद्धा आढळतात. बलुची समाजाला अशी भीती आहे की विकासाच्या नावाखाली पाकिस्तान सरकार या भागात बिगरAबलुुची समाजाला, खासकरून पंजाबी मुस्लिमांना वसवत आहे. यामुळे बलुचिस्तानातला बलुची समाज अल्पसंख्य होईल.
बलुची समाज जरी मुस्लीम असला तरी बराचसा निधर्मी असतो. हा समाज भटक्या मनोवृत्तीचा आहे. पाकिस्तानात समावेश झाल्यापासून बलुची समाजाची अशी धारणा झालेली आहे की त्यांना ऊर्दू भाषिक पंजाबी मुस्लीम दुय्यम दर्जाची वागणूक देतात. बलुची समाजाची शोकांतिका वेगळ्या प्रकारची आहे. क्षेत्रफळाच्या संदर्भात बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत. तेथे एकूण जमिनीच्या 45 टक्के जमीन बलुचिस्तानात आहे. पण लोकसंख्येचा विचार केल्यास हा प्रांत पाकिस्तानातील सर्वात छोटा प्रांत आहे. तेथील लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 5 टक्के आहे. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे तेथे नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. खासकरून नैसर्गिक वायूचे साठे आहेत.
बलुचिस्तानचा भूगोलसुद्धा वेगळा आहे. या प्रांताच्या सीमारेषा दोन देशांशी भिडतात. एका बाजूला अफगाणिस्तान आहे तर दुसरीकडे इराण आहे. अशा स्थितीत अलगतावादी गटांना सीमेपलिकडून मदत मिळण्याची शक्यता असते. बलुची समाजात ‘बलुच लिबरेशन आर्मी’ आहे, ‘बलुचिस्तान रिपब्लिकन आर्मी’ आहे शिवाय ‘बलुच लिबरेशन फ्रंट’ असे अनेक दहशतवादी गट आहेत. यातील अनेक संघटनांचे नेते आज पाकिस्तानच्या बाहेर आहेत. पाकिस्तानी राज्यकर्ते बलुची जनतेवर बिनदिक्कतपणे अन्याय व अत्याचार करत असतात. तेथे अनेक बलुची लोक गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. या गायब झालेल्या लोकांची प्रेतं नंतर सापडतात. या घटनांच्या मागे कोण आहे, हेसुद्धा सर्वांना माहिती आहे. पण कोणी दखल घेत नाही.
अशा घटनांमुळे बलुची राष्ट्रवाद फोफावण्यास मदत होते. पाकिस्तानची निर्मिती इस्लामचा आधार घेऊन झाली होती. पण पुढे तेथे सत्ता बघता बघता ऊर्दू भाषिक पंजाबी प्रांतातील मुस्लिमांच्या हातात केंद्रित झाली. याविरूद्ध प्रथम तत्कालिन पूर्व पाकिस्तानातील बंगाली मुस्लिमांनी आवाज उठवला होता. त्यांनी रक्तरंजीत संघर्ष करून डिसेंबर 1971 मध्ये बांगलादेशच्या रूपाने स्वातंत्र्य मिळवले. आता जवळपास तसेच वातावरण बलुचिस्तानात निर्माण झाले आहे. तेथे पाकिस्तानच्या वसाहतवादी धोरणांबद्दल राग खदखदत आहे. 2000 सालापासून बलुचिस्तानच्या नेत्यांनी अधिकृतपणे गनिमी लढ्याची घोषणा केली.
बलुचिस्तानला स्वतःच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदा झाला नाही. नैसर्गिक संपत्तीबद्दल पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत प्रांत म्हणजे बलुचिस्तान. पण आज पाकिस्तानातला सर्वात मागासलेला प्रांत म्हणजे बलुचिस्तान.पाकिस्तानातल्या जीवनाच्या जवळपास सर्व क्षेत्रात पंजाबी मुस्लिमांची दादागिरी. दोघांचा धर्म जरी एक असला तरी भाषा आणि संस्कृती भिन्न असल्यामुळे त्यांच्यात एकोपा कधी झाला नाही. याचा पहिला उद्रेक डिसेंबर 1971 मध्ये ‘बांगलादेश’ निर्माण होऊन झाला. आता बलुचिस्तानसुद्धा त्याच मार्गाने जात असल्याची शंका येते.
आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. ज्या प्रकारे व ज्या निष्ठुरतेने पाकिस्तानने 1973 व 2006 मध्ये बलुची समाजाचे उठाव दडपून टाकले होते, तसे आता यापुढे करता येणार नाही. बलुची समस्येमुळे पाकिस्तानचा काश्मीरच्या संदर्भातील प्रचार बराच फिका पडतो. पाकिस्तान नेहमी काश्मीरमध्ये भारताने ‘सार्वमत घ्यावे’ अशी मागणी करतो. जर अशीच मागणी बलुची समाजाने केली तर पाकिस्तान ती मान्य करणार आहे का, असा प्रश्न समोर येतो. याचे उत्तर अर्थातच नकारात्मक असल्यामुळे पाकिस्तानची अडचण होते.
भारत बलुची अलगतावाद्यांना सर्व प्रकारची मदत करतो, हा पाकिस्तानचा ठरलेला आरोप असतो. याबद्दल फक्त भारताला दोष देऊन भागणार नाही तर बलुची समाजावर पाकिस्तानी राज्यकर्ते करत असलेले अत्याचार कमी झाले पाहिजे. त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्या पाहिजे. जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत भारतावर आरोप करून प्रश्न सुटणार नाही आणि परिस्थिती आटोक्यात येणार नाही.