पाषाण पम्पिंग स्टेशन येथे पाण्याच्या टाकीतून गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया…..

औंध – उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी तसेच नव्याने समाविष्ट झालेले सूज व महाळुंगे या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिक पाणीटंचाईमुळे अत्यंत त्रस्त झाले आहे. परिसरातील सोसायट्यांना तर त्यांच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकरचा सहारा घ्यावा लागत आहे. महानगरपालिकेचे पाणी नळाला कमी प्रमाणात येत असल्यामुळे खाजगी पाणी टँकरवर सोसायटी वर्गास अवलंबून राहावे लागत आहे.
या पाणीटंचाईमुळे राजकीय पक्षांनी विविध प्रकारे पाणीटंचाई सोडविण्याचे प्रयत्न केले. तसेच मेन टाकीमधून पाषाण पम्पिंग स्टेशनला येणाऱ्या पाण्याचे प्रमाण देखील वाढविण्यात आले. तरीदेखील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे.
परिसरातील नागरिकांना प्रश्न पडला होता की नक्की आपल्याला मिळणारे पाणी मुरतय कुठे. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पाषाण पम्पिंग स्टेशन येथे पाहणीसाठी गेले असता त्या ठिकाणी एक धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली. पाषाण पंपिंग स्टेशन येथील टाकी लिक असल्यामुळे या टाकीमधून 24 तास पाणी वाया जात आहे. अंदाजे एका दिवसात शंभर ते सव्वाशे टँकर पाणी भरेल इतक्या मोठ्या प्रमाणात दररोज या टाकीमधून पाणी गळती होत आहे.
या टाकीमध्ये येणाऱ्या पाण्यापैकी 30 ते 40 टक्के पाणी हे वाया जात असून हे सर्व पाणी शेजारच्या रामनदी मध्ये वाहून जात आहे.
यासंदर्भात परिसरातील नागरिकांना विचारले असता त्यांनी सांगितले की हे पाणी दिवसभर चालू असते. सकाळच्या वेळेत या वाया जात असलेल्या पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. अनेक वेळा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे की या ठिकाणी पाणी वाया जात आहे परंतु पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
इंग्रजांच्या वेळेस या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी इंग्रज अधिकारी पाषाण तळ्यातील पाणी पुणे विद्यापीठ तसेच राज भवन या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी या टाकी चा वापर करण्यात येत होता. ही टाकी जवळपास सत्तर वर्षापेक्षा जास्त जुनी आहे.
पाषाण पंपिंग स्टेशन येथून पाषाण, सुतारवाडी ,बाणेर, बालेवाडी ,सोमेश्वर वाडी तसेच सुस व महाळुंगे या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या गावांचा पाणी प्रश्न पाहता असे निदर्शनास येते की या टाकीमधून वाया जाणारे पाणी जरी थांबवले तरी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाई तुन थोडाफार दिलासा मिळू शकेल.
यासंदर्भात पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी बोलले असता त्यांनी सांगितले की ही टाकी 70 वर्षे जुनी आहे वारंवार टाकी रिपेरिंग काम करून घेतले आहे परंतु टाकी जुनी असल्यामुळे ही गळती होत आहे. या टाकी शेजारी नवीन टाकी बांधण्यात आली आहे. टाकी टेस्टिंग चे काम चालू आहे. थोड्याच दिवसात ही नवीन टाकी चालू केल्यावर जुन्या टाकीचा वापर बंद करण्यात येईल.
अमोल बालवडकर माजी नगरसेवक
आज पाषाण येथील पंपिंग स्टेशनवर प्रत्यक्ष जाऊन बाणेर बालेवाडीला निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाई बाबत आढावा घेतला.
यावेळी पाषाण पंपिंग स्टेशन येथील टाकी गेल्या ३ महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याची माहिती मिळाली, जवळपास २४ तास दररोज हे पाणी वाहत असुन सुमारे १ करोड लिटर पिण्याचे पाणी रामनदीला जाऊन मिळत आहे. यामुळेच बाणेर-बालेवाडी भागाला दैनंदिन सुमारे १ करोड लिटर पाणी पुरवठा कमी होत असल्याचे निदर्शनास आले.
हि समस्या पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अधिकार्यांना माहिती असुन सुद्धा जाणीव पुर्वक का सोडवण्यात आली नाही..?
गेली ३ महिन्यांपासुन बाणेर-बालेवाडीचे हजारो नागरीक या पाणी समस्येमुळे त्रस्त आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारे स्वतःची जबाबदारी स्विकारत नसुन जाणीवपुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणुन येत्या ४ दिवसात जर बाणेर-बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर माझ्या समस्त बाणेर-बालेवाडीतील नागरीकांना आवाहन आहे की आपण पुणे महानगरपालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदारीने काम करत नसुन जाणीव पुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारची तक्रार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे फोन किंवा मेसेज द्वारे करावी हि विनंती.
सर्वप्रथम मी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन अजितदादा पवार तसेच स्थानिक आमदार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व पुणे शहराचे खासदार गिरीष बापट यांच्याकडे या विषयाबाबत तक्रार करणार असुन या सर्वांनी बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न सोडविण्याकरीता लक्ष घालावे अशी विनंती करणार आहे.





