Pimpri-Chinchwad: गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडमधून लाखो नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास
Pimpri-Chinchwad : एकट्या पीसीएमसी स्थानकावर ४.७२ लाख प्रवाशांची नोंद

पिंपरी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोला यंदा प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, त्याचा मोठा फायदा पिंपरी-चिंचवडकरांनाही झाला. गणेशोत्सवाच्या १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या १२ दिवसांच्या कालावधीत तब्बल ४८,३२,९१५ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.
या कालावधीत मेट्रोला ७,४९,२८,३७७ रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे, पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिका-१ वर २५,१५,५१६ प्रवाशांनी प्रवास केला असून या मार्गिकेतून ४,१७,४६,६२६ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोच्या पीसीएमसी स्थानकाला गणेशोत्सव काळात मोठी गर्दी झाली. या १२ दिवसांत पीसीएमसी स्थानकावर ४,७२,६५८ प्रवाशांची नोंद झाली असून स्थानकातून ९९,६९,८४९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे गणेशोत्सवातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या पाच स्थानकांमध्ये पीसीएमसी स्थानकाचा समावेश झाला.
अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीही पीसीएमसी स्थानकावर मोठी गर्दी झाली. २५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ या २४ तासांत मेट्रोने ५,८०,२८० प्रवाशांनी प्रवास केला. याच दिवशी पीसीएमसी स्थानकावर ४३,४९१ प्रवाशांची नोंद झाली असून ९,२४,९२४ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत मेट्रोच्या प्रवासी संख्येतही मोठी वाढ झाली. २०२४ मध्ये गणेशोत्सव काळात २०,४५,१०० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला होता. २०२५ मध्ये हा आकडा ३७,१७,५७८ झाला. यंदा २०२६ मध्ये तो ४८,३२,९१५ वर पोहोचला. २०२५ च्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत २९.९९ टक्के, तर २०२४ च्या तुलनेत १३६.३२ टक्के वाढ झाली.
गणेशोत्सव काळात जिल्हा न्यायालय स्थानकावर १०,३९,४५२ प्रवाशांनी मार्गिका बदलून मेट्रोच्या जोडणी व्यवस्थेचा लाभ घेतला. विसर्जनाच्या २४ तासांतच १,२२,५५२ प्रवाशांनी इंटरचेंज सेवेचा वापर केला.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत ७१ टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा, तर २९ टक्के प्रवाशांनी कागदी तिकिटाचा वापर केला. एकूण ८६ टक्के प्रवाशांनी अॉनलाईन /युपीआय कार्ड द्वारे, तर १४ टक्के प्रवाशांनी रोख रकमेने तिकीट खरेदी केली.
गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने गाड्यांची वारंवारता दर पाच मिनिटांवर आणली होती. तसेच २४ तास अखंडित सेवा देण्यात आली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी गणेशोत्सवादरम्यान लाखो भाविकांनी मेट्रोवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल प्रवाशांचे आभार मानले.
सार्वजनिक वाहतुकीला प्रवाशांनी दिलेले प्राधान्य आणि डिजिटल तिकीट प्रणालीचा वाढता वापर यामुळे गणेशोत्सवातील मेट्रो सेवा अधिक सुलभ व सुरक्षित झाल्याचे त्यांनी नमूद केले.
Sangli : मिरजेत गणेश विसर्जनाची तब्बल साडे ३२ तासांची मिरवणूक





