डॉक्टर तुम्हांला सलाम! पुण्यात ‘लाख’मोलाची करोनामुक्ती

पुणे – शहरात करोनातून बरे झालेल्या संख्येने सोमवारी एक लाखाचा टप्पा पार केला आहे. ही संख्या नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे. दरम्यान, बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्याही अधिक आहे. दिवसभरात 1 हजार 456 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर नव्याने 1,100 बाधित सापडले आहेत. दरम्यान, करोनामुळे गेल्या 24 तासांत 39 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
सोमवारी (दि. 14) दिवसभरात केवळ 2,807 संशयिताची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 5 लाख 37 हजार 452 जणांच्या तपासणी अहवालातून 1 लाख 20 हजार 757 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील आतापर्यंत तब्बल 1 लाख 532 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
जवळपास बरे होण्याचे प्रमाण 83.25 टक्के इतके आहे. शहरातील सक्रीय बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्या 17 हजार 393 बाधित सक्रिय असून, त्यातील 928 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 479 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. तर 449 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.





