Amin Haji : लगानने माझं करिअर उद्ध्वस्त केलं; 25 वर्षानंतर ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
Amin Haji : यावेळी अनेकांनी आपले अनुभव शेअर केले. लगानमध्ये ‘बाघा’ ही संस्मरणीय भूमिका साकारणारे अभिनेते अमीन हाजी यांनी 25 वर्षांनंतर धक्कादायक खुलासा केला आहे.

Amin Haji : आमिर खानच्या ( Amir Khan ) ‘लगान’ या सुपरहिट चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. या चित्रपटाने अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली. नुकतेच या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाले असून, या निमित्ताने चित्रपटातील कलाकार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेकांनी आपल्या आठवणी शेअर केल्या.
लगानमध्ये ‘बाघा’ ही संस्मरणीय भूमिका साकारणारे अभिनेते अमीन हाजी यांनी 25 वर्षांनंतर धक्कादायक खुलासा केला आहे. अमीन हाजी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘लगान’मधील भूमिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी एक उच्च मापदंड ठरली. चित्रपटातील कथा आणि पात्रांची ताकद इतकी प्रभावी होती की त्यानंतर मिळालेल्या अनेक भूमिका त्यांना समाधानकारक वाटल्या नाहीत. (Amin Haji )
“लगान’नंतर माझ्याकडे आलेल्या कोणत्याही भूमिका त्या दर्जाच्या नव्हत्या. या चित्रपटाने अभिनेता म्हणून माझ्या अपेक्षा खूप उंचावल्या. ‘लगान’ने मला व्यावसायिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलं,” असे अमीन हाजी म्हणाले. (Amin Haji )
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लगान’मध्ये अमीन यांनी ‘बाघा’ ही भूमिका साकारली होती. बोलू आणि ऐकू न शकणारा हा गावकरी आपल्या बुद्धिमत्तेमुळे आणि समजूतदारपणामुळे भुवनच्या क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य ठरतो. आजही ‘बाघा’ हे पात्र चित्रपटप्रेमींच्या स्मरणात कायम आहे.
या भूमिकेसाठी अमीन यांनी विशेष मेहनत घेतली होती. कर्णबधिर आणि मुक्या व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या हालचाली, देहबोली आणि भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून पात्र अधिक वास्तववादी वाटेल. (Amin Haji )
‘लगान’ने अमीन यांच्या वैयक्तिक आयुष्यालाही नवे वळण दिले. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची ओळख ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ शार्लट व्हिटबी-कोल्स यांच्याशी झाली. पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी विवाह केला.
अभिनयासोबतच अमीन हाजी यांनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही आपली छाप सोडली. ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांच्या लेखनात त्यांनी योगदान दिले, तर ‘कोई जाने ना’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण केले.
तरीही, आजही त्यांची ओळख ‘लगान’मधील ‘बाघा’ या भूमिकेमुळेच सर्वाधिक आहे. त्यांच्या मते, ही भूमिका इतकी प्रभावी ठरली की त्यानंतर तशा ताकदीचे पात्र पुन्हा मिळणे कठीण झाले.
हेही वाचा : SET Exam: विद्यार्थ्यांना दिलासा! सेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; कधीपर्यंत भरता येणार अर्ज?






