आता राज्यात शिंदे सरकार राबवणार ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना ? ; प्रत्येक महिन्याला मिळणार ‘एवढी’ रक्कम

Ladli Behna Yojana । लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतीळ फटक्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यातच आता राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्ये प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ही योजना महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्याच्या तिजोरीवर वर्षाला साधारण 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यातही लवकरच लाडकी बहीण योजना? Ladli Behna Yojana ।
एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,”राज्यातील शिंदे सरकार लवकरच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय सरकार घेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
अलिकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवले होते. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? याचा या पथकाने अभ्यास केला आहे. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
योजनेचे स्वरुप काय असू शकते? Ladli Behna Yojana ।
या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.
दारिद्रयरेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहणा योजना’ काय आहे? Ladli Behna Yojana ।
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘लाडली बहणा योजना’ लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच योजनेच्या जोरावर शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली.
महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. त्यानंतर आता झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला 29 पैकी 29 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे हे प्रारूप महाराष्ट्रातही राबवल्यास महायुतीला फायदा होईल, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना असावी. त्यामुळेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राबवण्याची शक्यता आहे.





