‘आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार’; सांगलीत मल्लिकार्जुन खर्गेंची मोठी घोषणा

सांगली – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार देखील केला जात आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. खर्गे म्हणाले, आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार राहुल गांधी हेही उपस्थित होते.
मल्लिकार्जुन खर्गे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी, बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्यासंदर्भात आणि लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केले.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे 1 लाख 70 हजार मतांनी जिंकले आहेत. मात्र, विश्वजीत कदम हे एका विधानसभेत 1 लाख 40 हजार मतांनी जिंकल्याचे सांगत खर्गे यांनी मोदींवर टीका केली. तसेच, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला, राम मंदीराला हात लावला ते गळत आहे, गुजराच्या पुलाचं उद्घाटन केल तर तो पुल पडला, मोदी येत आहेत, म्हणून पुतळा लवकर बनवला आणि पडला, असे म्हणत पुतळा कोसळल्यावरुन नरेंद्र मोदींना त्यांनी लक्ष्य केले.
लाडक्या बहिणींना 2 हजार रुपये देणार –
यावेळी खर्गे म्हणाले की, आमचं सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी आम्ही महिलांना 2 हजार रुपये देणार. मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपचे सरकार जाईल.
खरी शिवसेना आमच्यासोबत – खर्गे
खर्गे म्हणाले, खरी शिवसेना आमच्या सोबत आहे, खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे, त्यांच्या बाजूने सर्व नकली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत लक्षात ठेवा, खरं स्वातंत्र्य हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि नेहरु यांच्या दुरदृष्टीने मिळालं होतं, असेही खर्गे यांनी म्हटले.
मोदींना संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे –
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सांगली येथे जाऊन काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
यावेळी आयोजित सभेत राहुल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर सडकून टीका केली. चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सांगली येथे जाहीर सभेला संबोधित करताना काॅंग्रेस राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी फक्त शिवाजी महाराजांचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी.
पंतप्रधान मोदींनी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल त्यांची माफी मागितली होती. ज्याला कंत्राट दिले त्याने भ्रष्टाचार केला म्हणून पंतप्रधान माफी मागत असतील. महाराष्ट्रातील जनतेकडून चोरी केली आहे म्हणून माफी मागत असतील. शिवाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळा उभारण्यात आला मात्र तो पुतळा उभा राहील याची काळजी घेण्यात आली नाही.
महान महापुरुष शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला. मात्र भ्रष्टाचार आणि चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्यामुळे तो पुतळा पडला. पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांचीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे.
देशात जातनिहाय जनगणना करणार –
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि त्यांची इंडिया आघाडी देशात जातनिहाय जनगणना करेल. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारधारेचा बालेकिल्ला असल्याचा दावाही राहुल यांनी केला.





