Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारकडून ‘ही’ मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने (Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची ही योजना आहे. या योजनेमुळे महायुतीला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला असून, महिलांच्या प्रचंड समर्थनामुळे यश मिळाल्याचे मानले जाते.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील काही नेत्यांनी या योजनेतील मासिक सन्मान निधी १,५०० वरून २,१०० रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, महायुतीचे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी या वाढीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी निराशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, योजनेत अनियमितता आढळल्याने सरकारने कठोर पावले उचलली. पात्र नसलेल्या महिलांना योजना बंद करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात लाभार्थींची नावे वगळण्यात आली. याशिवाय, फसवणूक रोखण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले. आता फक्त ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षभरात लाखो महिलांची नावे वगळल्याने विरोधी पक्षांकडून ही योजना बंद पडणार असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे लाभार्थी महिलांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती येथे झालेल्या प्रचारसभेत या आरोपांना ठोस उत्तर दिले. ते म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवला आहे. मी स्वतः गरिबी अनुभवली आहे, काटकसर पाहिली आहे. काही लोक ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले होते. मात्र, खोडा घालणाऱ्या लोकांना लाडक्या बहिणींनी जोरदार जोडा हाणला आहे. कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही.”
शिंदे यांनी महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणावर भर देताना ही योजना कायमस्वरूपी चालू राहील, अशी स्पष्ट ग्वाही दिली. या विधानामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, योजनेच्या भवितव्याबाबत निर्माण झालेली शंका दूर झाली आहे. सध्या योजना सुरळीत सुरू असून, पात्र महिलांना नियमित हप्ते जमा होत आहेत.





