लाडकी बहीण योजना बेतली जीवावर; अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

गोंदिया : राज्य सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेनुसार महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे, महिला भगिनींनी कागदपत्रे जुळवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. महिलांसाठी घरातील कर्ते पुरुषही शासनाच्या या योजनेचा लाभ घरातील महिलांना मिळावा म्हणून प्रशासनाच्या कार्यालयात खेटे मारताना दिसत आहेत. मात्र, या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे.
काय घडले नेमके?
सध्या राज्यभरामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरिता कागदपत्रांची जुळवा-जुळव सुरू आहे. याच आवश्यक कागदपत्रांकरिता ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्तरावर येत असतात.मृत शिवलाल लाडे (43) हे त्यांच्या पत्नीला निलज या गावातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची कागदपत्रे घेण्यासाठी तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे घेऊन गेले होते. मात्र, शिवलाल यांच्याकडून घरी एक कागदपत्रं विसरल्याने ते राहिलेले कागदपत्र घेऊन अर्जुनी मोरगावकडे परत जात असताना त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
मोरगाव टि-पॉइंट येथे हिमालय बारसमोर वडसाहून कोहमाराकडे जाणाऱ्या एका ट्रकने शिवलाल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये शिवलाल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना त्या ठिकाणी मृत घोषित केले. मोरगाव अर्जुनी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.





