Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदेंची मोठी घोषणा; लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटणार
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द सरकार योग्य वेळी पूर्ण करणार आहे.
“दिलेला शब्द पूर्ण करू”
शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींना सन्मान निधी २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. “आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत. जे बोलतो ते करून दाखवतो,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. योग्य वेळी निधीवाढीचा निर्णय अमलात आणला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
योजनेचा मोठा आर्थिक भार
शिंदे यांनी सांगितलं की, ही योजना सुरू करताना वार्षिक खर्च ४५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार असल्याचं स्पष्ट होतं. तरीही सरकारने धाडसाने निर्णय घेतला. राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये याची काळजी अजित पवार यांनी घेतली, असंही त्यांनी नमूद केलं.
अर्थसंकल्पाकडे लक्ष
यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार असून, “राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहिती आहे,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेईल, असं ते म्हणाले.
विरोधकांवर टीका
लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांवरही शिंदे यांनी हल्लाबोल केला. काही जण आता तीन हजार रुपये देण्याची मागणी करत असले, तरी सुरुवातीला त्यांनीच योजनेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांनी केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या घोषणेमुळे लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीवाढीबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लाभार्थींमध्ये उत्सुकता वाढली आहे.




