Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश! आझाद मैदानात हजारो महिला रस्त्यावर…काय आहे मागणी?
Ladki Bahin Yojana: महिला व बालविकास विभागाच्या उपसचिवांना दिले निवेदन; मंत्री अदिती तटकरे आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन.

Ladki Bahin Yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या गरीब, गरजू, कष्टकरी, विधवा, परितक्त्या व निराधार महिलांना पुन्हा पात्र करून योजनेचा लाभ द्यावा, या मागणीसाठी आझाद मैदान येथे कष्टकरी संघर्ष महासंघाच्या महिला नेतृत्वाखाली ‘लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, ठाणे-कल्याण, पिंपरी-चिंचवड यांसह विविध जिल्ह्यांतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. ई-केवायसी, कागदपत्र पडताळणी, सर्व्हर डाऊन, पोर्टल बंद, ओटीपी न मिळणे आदी तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागल्याचा आरोप करण्यात आला.
सर्व्हर डाऊन, पोर्टल बंद, ओटीपी प्राप्त न होणे, अर्ज सादर न होणे आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करता न आलेल्या महिलांना पुन्हा संधीची मागणी करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी अपात्र महिलांना पुन्हा संधी देण्याबरोबरच अर्थसहाय्य ₹१,५०० वरून ₹२,१०० करण्याची मागणी केली. तसेच विधवा व परितक्त्या महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक सहाय्याची तरतूद करून पात्र महिलांना दरमहा ₹५,००० देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने महिला व बालकल्याण विभागाचे उपसचिव आ.ना. भोंडवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच मंत्री अदिती तटकरे व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विविध जिल्ह्यांतील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





