Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डिसेंबर 2025 च्या हप्त्यात तब्बल 86 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षापर्यंत या योजनेचा लाभ सुमारे 2 कोटी 40 लाख महिला घेत होत्या. मात्र डिसेंबर महिन्यात केवळ 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यातच रक्कम जमा झाली. सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत 2 कोटी 40 लाख लाभार्थ्यांपैकी 1 कोटी 90 लाख महिलांनी e-KYC पूर्ण केली. पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या 1 कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता देण्यात आला. उर्वरित सुमारे 86 लाख महिलांना विविध कारणांमुळे लाभ मिळू शकला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की, अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास संबंधित महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. दरम्यान, जानेवारी 2026 चा हप्ता अद्याप वितरित झालेला नाही. सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरणास विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही योजना 18 ते 65 वर्ष वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत सुरुवातीला अनेक महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होऊ लागले होते. मात्र निवडणुकांनंतर मोठ्या प्रमाणावर महिलांना वगळण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.